राजस्थानच्या मुलीने दिली महाराष्ट्रातील मुलीची डमी परीक्षा

नवी मुंबई: केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेत बनावट परीक्षार्थी बनून परीक्षा देणाऱ्या मुलीचा भांडाफोड झाला आहे. या प्रकरणी परीक्षा देणाऱ्या मुलीला सीबीडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

केंद्र सरकारच्या वतीने ५ मे रोजी नीट ची परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी सीबीडी बेलापूरमधील डी. वाय. पाटील मॅनेजमेंट कॉलेजमधील केंद्रावर परीक्षा होती. यावेळी नवी मुंबईतील एका विद्यार्थिनीच्या नावाने राजस्थानमधील एक मुलगी परीक्षा देत होती.

पर्यवेक्षकांना संशय आल्याने तिची अधिक चौकशी केली असता सदर प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर कॉलेज प्रशासनाने सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर सदर मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिने अजून असे प्रकार केले असल्याचा संशय पोलिसांना असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश गोरे यांनी दिली आहे.