ठाणे: नौपाड्यात बेडेकर विद्या मंदिरच्या बाजूला असलेल्या ६० वर्षे जुन्या दोन मजली संकल्प सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरी कोसळली. ही घटना सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नसून ती इमारत सी 2 बी प्रवर्गातील म्हणजे धोकादायक नव्हती. तरीही तडे गेल्यामुळे इमारत धोकादायक बनल्याने इमारतीचा पाणीपुरवठा आणि वीज पुरवठा खंडित करून इमारत रिकामी करण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे मनपा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
नौपाडा परिसरातील संकल्प सोसायटीच्या पहिला मजल्यावरील गॅलरीचा भाग पडल्याची माहिती मिळताच घटनास्थळी उपआयुक्त (परिमंडळ-०२), सहाय्यक आयुक्त (नौपाडा-कोपरी प्रभाग समिती), आपत्ती व्यवस्थापन अधिकारी – कर्मचारी, अतिक्रमण विभाग, पाणीपुरवठा विभाग व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. या इमारतीला तडे गेल्याने इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. ही इमारत सुमारे ६० वर्षे जुनी असून ती रिकामी करण्यात आली आहे. तर तळ मजल्यावरील दोन्ही दुकानेही रिकामी करण्यात आली आहेत. तर इमारतीमधील सात रहिवाशांनी स्वतःची राहण्याची व्यवस्था आपल्या नातेवाईकांकडे केली आहे. तर, इमारतीमधील पाणीपुरवठा ठामपा पाणीपुरवठा विभागाचे पूर्णपणे बंद केला असून विद्युत पुरवठा महावितरणचे कर्मचाऱ्यांनी खंडित केला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने इमारती सभोवती धोकापट्टी बांधण्यात आली आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.