आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी
कल्याण : दारू पिऊन क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात मित्रानेच मित्राचा धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान आपल्या मित्राची चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा बनाव या आरोपीने रचून पोलीसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला होता .पण पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवून अखेर आरोपींला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आज आरोपी बबलू याला कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केला असता त्याला न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बेचन प्रसाद चौहान (32) रा .त्रिमूर्ती नगर असे मयत तरुणाचे नाव असून तर बबलू चौहान (35) असे आरोपी मित्राचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका परिसरामध्ये बेचेन आणि बबलू चव्हाण हे भाड्याने राहत होते. उत्तरप्रदेश येथे गावी जाण्यासाठी काल रात्री 1;20 च्या गाडीने कल्याणहून ते दोघे जाणार होते. त्यासाठी रिक्षाने ते शेलारनाका येथील घरातून 12.30 च्या सुमारास ठाकुर्ली समांतर रस्त्याने जात होते. त्याचवेळी तीन अनोळखी तरुणांनी त्यांची रिक्षा अडवून रिक्षा चालकास मारहाण करून पळून लावले. त्यानंतर बेचेन आणि बबलू यांना चाकूच्या धाकाने त्यांच्याकडील पैसे आणि मौल्यवान वस्तू हिसकावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना मारहाण करून शेजारील ठाकुर्ली रेल्वे ट्रॅकवर नेले. तेथे त्यांच्यावर चाकूने वार केले .यात बबलूने आरोपीच्या तावडीतून कसाबसा आपला जीव वाचून तेथून पळ काढला. मात्र बेचेन हा त्यांच्या तावडीत सापडला. अखेर जखमी बबलूने ही माहिती मध्यरात्री त्याच्या नातेवाईकांना आणि पोलिसांना दिली. तेव्हा सकाळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर ठिकाणी पंचनामा केला असता बेचेनचा मृतदेह धड आणि मुंडके हे वेगळे झालेले स्थितीत पोलीसांना सापडला.
दरम्यान बबलूने दिलेली माहिती आणि पोलिसांना तपास मिळत असलेली माहिती यात कोणतेही तारतम्य जुळत नव्हती. अखेर पोलिसांनी बबलूची उलट तपासणी करत त्याला पोलिसी खाक्या दाखवताच, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. माझ्यात आणि बेचेन मध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्याने मी त्याची हत्या केल्याची कबुली त्याने पोलिस जबानीत दिली आहे . डोंबिवली रेल्वे पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.