ठाण्याच्या पाचपाखाडीत परिसरातील इमारतीला आग

२० रहिवाशांची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका

ठाणे : पाचपाखाडीतील एका इमारतीच्या सातव्या मजल्यावरील डक्टला आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. इलेक्ट्रिक वायरिंगला आग लागल्याने धुराचे लोळ उठले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इमारतीत असलेल्या २० नागरिकांना बाहेर काढून त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यानंतर अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

मंगळवारी संध्याकाळी ४.४०च्या सुमारास ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार रायगड गल्ली, कचराळी तलावामागे, पाचपाखाडी, ठाणे (प.) या ठिकाणी तळ अधिक १५ माळ्याची इमारत आहे. या इमारतीत एकूण ६० सदनिका आहेत. इमारतीच्या आठव्या मजल्यावर इलेक्ट्रिक डक्टमध्ये वायरिंगला आग लागली होती. हळूहळू आग १५ व्या माळ्यापर्यंत डक्टमार्गे पसरली आणि धुराचे लोळ उठले.

घटनास्थळी मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख यासिन तडवी, अग्निशमन दलाचे जवान फायर इंजिनसह पोहचले. धुराचे आणि आगीचे लोळ उठले असताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इमारतीतील २० नागरिकांना घराच्या बाहेर सुरक्षित काढून अग्निशमन दलाने आगीवर अवघ्या अर्ध्या तासात नियंत्रण मिळवले. या आगीत कुणीही जखमी झालेले नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.