मसाला बाजारात सुक्या मेव्याच्या दुकानाला भीषण आग

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील मसाला बाजार आवारातील एच २३ या सुका मेव्याच्या दुकानाला सोमवारी पहाटे सव्वा तीन वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे १५ तासाच्या वर प्रयत्न सुरू होते.

मसाला बाजार आवारात खजूर, अक्रोड, काजू, बदाम आदी सुक्या मेव्यासह मोठ्या प्रमाणावर मसाला दुकाने आहेत. सोमवारी पहाटे सवातीन वाजता येथील एच २३ या सुका मेव्याच्या दुकानाला भीषण आग लागली. आगीची घटना समाजताच वाशी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र दुकानात मोठ्या प्रमाणात अक्रोड आणि पॅकिंग साहित्य असल्याने आग अधिकच भडकली. त्यामुळे आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. ही आग सोमवारी सायंकाळ पर्यंत धुमसतच होती. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती वाशी अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली. मात्र या घटनेने बाजार समितीतील अग्नी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.