संगीतभूषण पं. राम मराठे संगीत समारोह
ठाणे: संगीतभूषण पं. राम मराठे यांचा नातू युवा गायक भाग्येश मराठे याच्या गाण्याने सुरू झालेल्या २८व्या पं. राम मराठे संगीत समारोहाचा कळसाध्याय डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे आणि पं. संजीव अभ्यंकर यांच्या ‘जसरंगी’ या अनोख्या कार्यक्रमाने रविवारी रात्री लिहिला गेला.
एकाहून एक अप्रतिम कलाविष्कारांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. महोत्सवात झालेल्या ‘संगीत मंदारमाला’ या नाटकाच्या प्रयोगास रसिकांची हाऊसफुल्ल उपस्थिती होती.
ठाणे महानगरपालिका आयोजित संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहाचे यंदाचे २८ वे वर्ष होते. पं. राम मराठे यांची जन्मशताब्दी असल्याने हे वर्ष आणखी लक्षणीय ठरले. १ ते ३ डिसेंबर या काळात गडकरी रंगायतन येथे डॉ. पं. अजय पोहनकर यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. या समारंभात पं. सुरेश तळवलकर आणि निषाद बाक्रे यांना पं. राम मराठे स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले.
पहिल्या दिवशी भाग्येश मराठे यांनी राम मराठे यांच्या परंपरेची आठवण करून देणारे दमदार गायन सादर केले. त्यांना स्वप्निल भिसे (तबला), सिद्धेश बिचोलकर (हार्मोनियम) यांची साथ लाभली. तर, सुधांशू सोमण आणि क्षितिज डिंगोरे हे तानपुऱ्यावर साथीला होते. पहिल्या दिवसाची सांगता झाली ती ज्येष्ठ सतार वादक उस्ताद शुजात खान यांच्या सतार वादनाने. मनाचा ठाव घेणाऱ्या त्यांच्या वादनाने रसिक सुखावले आणि त्यांना आणखी वादन करण्याची विनंती करण्यात आली. शुजात खान यांनीही रसिकांच्या फर्माईशिला दाद दिली. त्यांना अमित चौबे आणि सपन अंजारिया यांची तबला साथ होती.
दुसऱ्या दिवशी, शनिवारी, सोलापूरहून आलेल्या जाधव कुटुंबियांनी सुंद्री वादनाचा अनोखा आविष्कार सादर केला. या वाद्याची निर्मिती, त्याची साधना यांच्याविषयी माहिती देते पं. भीमण्णा जाधव यांनी रसिकांना सुंद्री वादनाने खिळवून ठेवले. त्यांच्यासोबत, त्यांची मुलगी कलाश्री जाधव आणि मुलगा व्यंकटेश कुमार यांनी सुंद्री साथ केली. तर तबला साथ रविकिरण नाकोड यांची होती. दुसऱ्या सत्रात, अभिनेत्री आणि नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांनी कथ्थक नृत्याविष्कार सादर केला. त्यांचा अदा, सादरीकरण आणि पदन्यासाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कथ्थक नृत्याची साधना करणारे विद्यार्थी, विद्यार्थीनी या सत्रास मोठ्या प्रमाणावर हजर होते. जमेनीस यांनी तबला साथ पं. मुकुंदराज देव यांची होती. तर, वैष्णवी देशपांडे (पढंत), वैभव मांकड ( हार्मोनियम/गायन), संकेत नातू (बासरी) हे त्यांचे साथीदार होते. या दिवसाची सांगता शुभा मुद्गगल यांच्या दैवी गायनाने झाली. त्यांनी रसिकांच्या फर्माइशिंना प्रतिसाद देत अविस्मरणीय गानअनुभव दिला. प. अनीश प्रधान (तबला) आणि पं. सुधीर नायक (हार्मोनियम) यांची त्यांना साथ होती. तर, तानपुरासाथीला श्वेता देशपांडे आणि उपग्ना पंड्या हे कलाकार होते.
रविवारी, महोत्सवाच्या सांगतेला पहिल्या सत्रात शाश्वथी चव्हाण यांचे गायन होते. तसेच, मंजिरी वाठारे यांचे कथ्थक नृत्य सादर झाले. दोन्ही युवा कलाकारांनी आश्वासक सादरीकरण करून रसिकांची दाद मिळवली. शाश्वथी यांनी कार्तिकस्वामी (तबला) व उमेश पुरोहित (हार्मोनियम) यांची साथ लाभली. तर, मंजिरी वाठारे यांना विवेक मिश्रा (तबला), युवराज सोनार (बासरी), वैदेही गावंडे (पढंत) आणि श्रीरंग टेंबे (गायन व हार्मोनियम) यांची साथ मिळाली.
दुसऱ्या सत्रात पं. राम मराठे यांच्या संगीताने नटलेले आणि लेखक विद्याधर गोखले यांच्या समर्थ लेखणीमुळे अजरामर झालेले संगीत मंदारमाला हे तीन अंकी नाटक सादर झाले. त्याचे दिग्दर्शन पं. संजय मराठे यांचे होते. तर संयोजन पं. मुकुंद मराठे यांनी केले होते. या नाटकात, भाग्येश मराठे, मकरंद पाध्ये, प्राजक्ता मराठे, सुधांशू सोमण, प्रिया देव, रमेश चांदणे, अरुण खरात या कलाकारांनी काम केले. रसिकांची सर्वाधिक उपस्थिती या प्रयोगास लाभली.
महोत्सवाची सांगता डॉ. अश्विनी भिडे देशपांडे आणि पं. संजीव अभ्यंकर यांच्या ‘जसरंगी’ या पं. जसराज यांच्या शैली व मांडणीच्या गानप्रकारांनी झाली. त्याचे विवेचन पं. संजीव अभ्यंकर यांनी केले. दोन वेगवेगळ्या रांगांची एकत्र मांडणी आणि त्यातून अनुभवाला येणारा अनोखा वेगळाच प्रकार रसिकांना भावला. मैफलीची सांगता मराठी आणि हिंदी भजनाने करून त्याचाही एक सर्वस्वी वेगळा अनुभव रसिकांना दिला. या मैफलीत, डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांना रोहित मुजुमदार (तबला), अभिनय रवंदे (हार्मोनियम), कौसर हाजी (तानपुरा) यांची साथ होती. तर, पं. संजीव अभ्यंकर यांना अ…