जनावरांची चरबी वितळवून तूप बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त

भिवंडी महापालिकेच्या कत्तल खान्याजवळच सुरू होता कारभार

भिवंडी: भिवंडी महापालिकेच्या कत्तलखान्याच्या आवारात मोठ्या प्रमाणावर म्हशी आणि रेडे कापल्यानंतर त्यांचे अवशेष आणून त्यामधील चरबी वितळवून त्यापासून बनावट तूप बनवले जात होते. ते तूप शहरातील छोट्या-मोठ्या खानावळी, हॉटेल व्यवसायिक यांना परस्पर विक्री करणाऱ्या कारखान्यावर कारवाई करून तो उद्ध्वस्त करण्यात आला.

पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या आदेशाने पर्यावरण विभागाचे नियंत्रण अधिकारी सहायक आयुक्त सुदाम जाधव यांनी पालिका आपत्कालीन विभागाच्या पथकासह घटनास्थळी छापा टाकून तेथून मोठ्या प्रमाणावर बनावट तुपाचे डबे आणि तूप बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे.

शहरातील ईदगाहरोड येथील कत्तलखाना सध्या बंद असताना या कत्तलखान्यात कापण्यात आलेल्या म्हशी रेड्यांचे अपशिष्ट याच कत्तलखान्यात टाकण्यात येतात. तेथे या अपशिष्टामधून चरबी वेगळी काढून सुकवून त्यापासून तूप बनविण्याचे काम या भागात बिनदिक्कत सुरू होते. हे भेसळयुक्त तूप अनेक खानावळी, लहान हॉटेल आणि तळलेले पदार्थ विक्री करणाऱ्यांना विक्री करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. याची गांभीर्याने दखल घेत आयुक्त अजय वैद्य यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर पालिका पर्यावरण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव,आपत्कालीन विभाग प्रमुख साकिब खर्बे, कर मूल्यांकन विभागाच्या कार्यालयीन अधीक्षक सायरा बानो यांनी पालिका पथकासह घटनास्थळी कारवाई करीत तेथे तूप कढविण्याच्या भट्टी सुरू असल्याचे आढळून आले.

त्यावेळी कर्मचाऱ्यांनी तूप कढविण्याच्या भट्टीवरील कढईमधील साहित्य ओतून देत बनावट तुपाचे १५ किलो वजनाचे २० डब्बे, कढई असे साहित्य जप्त केले आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडून स्थानिक भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सुदाम जाधव यांनी दिली आहे.