बदलापूर : मुंबईत कुर्ला परिसरात ताबा सुटलेल्या बेस्ट बस चालकाने केलेला अपघाताची घटना ताजी असतानाच एका मद्यधुंद अवस्थेतील रिक्षा चालकाने पायी चालणाऱ्या तिघांना धडक दिली. यावेळी पलटी झालेली रिक्षा पुन्हा सरळ करुन रिक्षाचालक फरार होण्याच्या तयारीत असताना, जमावाने रिक्षा थांबवली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
बदलापूर पश्चिम शनिनगर परिसरातील वर्दळीचा रस्ता असणाऱ्या भागात, आज सायंकाळी पाचच्या दरम्यान अचानक एक रिक्षा वेगात स्टेशन परिसराकडे जात असताना, त्या रिक्षाने पायी चालणाऱ्या तिघांना धडक दिली. रिक्षावरचा ताबा सुटल्याने, रिक्षा चालकाने ब्रेक दाबला असता, रिक्षा रस्त्यावर पलटी झाली. यावेळी रिक्षा पुन्हा उभी करुन, रिक्षा चालक पळण्याच्या तयारीत असताना, परिसरातील जमावाने एकत्र येऊन, रिक्षाचालकाला बाहेर काढले. यावेळी रिक्षाचालक आणि त्याचे दोन सहकारी मद्यधुंद अवस्थेत असून, त्यांना चालण्याची देखील ताकद नसल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. यावेळी जवळच्या हॉटेल मालकाने, पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी ज्या तीन नागरिकांना या रिक्षाने धडक दिली त्यातील एका महिलेला डोक्याला आणि पायाला दुखापत झाल्याचे पाहिले. व वेळीच नातेवाईकांच्या मदतीने त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. याच दरम्यान रिक्षा चालकाला आणि त्याच्या इतर दोन सहकाऱ्यांना देखील दुखापत झाल्याने, त्यांना देखील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.