‘लाडका खड्डा’वरून बदलापूरमध्ये रंगली चर्चा

बदलापूर : शासनाची लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना तयारी सुरू असतानाच शहरात पडलेल्या दरवर्षीच्या खड्ड्यांवरून राष्ट्रवादीने लाडका खड्डा असा उपरोधिक टोला लगावत प्रशासनाचे खड्ड्यांकडे लक्ष वेधले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने, पालिकेचा लाडका खड्डा या आशयाचे बॅनर लावले आहेत.

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली, शहरातील खड्डेमय झालेल्या रस्त्यांच्या विरोधात वारंवार आंदोलन करण्यात आले. मात्र आक्रमकपणे आंदोलन करून सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही. अखेर बदलापूरकराना होणाऱ्या खड्ड्यांच्या त्रासाची जाणीव करून देण्यासाठी, ‘वाहने सावकाश चालवा, पुढे कुळगांव बदलापूर नगरपालिकेचा लाडका खड्डा आहे’ अशा आशयाचे बॅनर त्यांनी पालिके बाहेर लावले असून, हे बॅनर आता बदलापूरकरांचे लक्ष वेधून घेत आहे. सर्वसामान्य बदलापूरकर हे बॅनर वाचून आपल्या तीव्र प्रतिक्रिया व संताप व्यक्त करत आहेत.

ऐन पावसाळ्यात बदलापुर शहरातील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांवर झालेल्या, खड्ड्यांची दुरुस्ती करण्याबाबत पालिकेकडे अनेकदा पत्रव्यवहार, निवेदन देण्यात आली आहेत. त्यानंतर आंदोलने सुद्धा घेण्यात आली. पालिका प्रशासनाला खड्डे दिसावेत आणि नागरिकांची त्रासातून मुक्तता व्हावी, दिलासा मिळावा असे प्रदेश सरचिटणीस देशमुख म्हणाले.