ठाणे : डॉ. अनुप देव हे दंतवैद्य म्हणून गेली 36 वर्षे कोपरी, ठाणे (पूर्व) येथे दातांचा दवाखाना चालवत आहेत. भारतीय दंत वैद्यक संस्था (इंडियन डेन्टल असोशिएशन) ठाणे शाखेचे अध्यक्षपद 2003-04 या वर्षी त्यांनी भुषवले आहे.
आपण सगळे एका वैश्विक ऊर्जेचे घटक आहोत. आपल्या शरिराभोवती (मानवाला) अदृश्य स्वरुपात असलेल्या सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा अभ्यास करता येतो. आपल्या प्राचीन अभ्यासकांना याची जाणीव होती. आपल्याला जे डोळ्यांनी दिसते ते आपले भौतिक किंवा स्थूल शरीर आहे. आपल्या डोळ्यांनी न दिसणारे सूक्ष्म शरीर आहे. या सूक्ष्म शरीरामध्ये सात प्रमुख चक्र, 72 हजार ऊर्जावाहक नाड्या आहेत. या सूक्ष्म शरीराभोवती एक ऊर्जावलय सुध्दा आहे. या ऊर्जा शरीराला आभामंडल किंवा ऑरा म्हणतात.
अपघातानेच डॉ. देव या विषयाकडे वळले. याविषयाच्या अभ्यासासाठी, त्यांनी 2013 मध्ये ठाणे येथे, इन्स्टिट्यूट ऑफ बायोफिल्ड इव्हॅल्युएशन व रिसर्च सेंटर, स्थापन केली आणि या विषयावर संशोधन सुरू केले. गेली 10 वर्षे ते ‘आभामंडळाचे विज्ञान’ या विषयावर संशोधन करीत आहेत. या अभ्यासासाठी आतापर्यंत सुमारे 2100 हून अधिक व्यक्तींचा ऑरा स्कॅन केला गेला असून त्या संशोधनाच्या आधारावर डॉ. देव यांनी 2018 मधे बायोफिल्ड स्कॅनद्वारे आपल्या भोवतीचे अदृश्य ऊर्जावलय, तसेच सूक्ष्म शरीरातील सात प्रमुख चक्र, 14 प्रमुख ऊर्जावाहक नाड्या बघून आरोग्याच्या समस्यांचे अचूक निदान, अचूक उपचार योजना, उपचारानंतरचे यशाचे पुरावे यावर पेटंट नोंदविले होते. हेच पेटंट भारत सरकारच्या इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ॲक्ट अंतर्गत 15 मार्च 2024 रोजी मंजूर झाले आहे. अशा प्रकारचे जागतिक स्तरावरील हे एकमात्र पेटंट आहे.
या विषयावर डॉ. देव स्वतः दोन दिवसांचा बेसिक अभ्यास वर्ग व दोन महिन्याचा प्रगत प्रशिक्षण वर्ग घेतात. आभामंडळ-विज्ञान व चिकित्सा या अदृश्य विज्ञानाला दृश्य स्वरुपात प्रकट करणारे मराठीतले पहिले पुस्तक मराठी व हिंदीमधे त्यांनी लिहिले आहे. आंतरराष्ट्रिय आयुर्वेदिक परिषदेत “छायाप्रभा व सूक्ष्म शरीर ” या विषयावर आता पर्यंत त्यांनी चार वेळा रिसर्च पेपरर्स सादर केले आहेत. सेंटरतर्फे डॉ. देव यांनी भारतभर या विषयावर 200 हून अधिक व्याख्याने दिली आहेत. तसेच या विषयाची ओळख व्हावी या उद्देशाने दोन दिवसांची 25 वर्कशॉप्स घेतली आहेत. सध्या या अतिप्रगत अतिसूक्ष्म विषयावर पीएच डी करणारे तीन विद्यार्थी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत.
पेटंट मिळाल्याबद्दल सर्व रुग्ण आणि समाजातील विविध स्तरावरील लोकांकडून डॉक्टर देव यांचे अभिनंदन होत आहे.