तिसऱ्या कळवा खाडी पुलाची एक मार्गिका मे अखेर होणार खुली

ठाणे : कळवा येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलाची एक मार्गिका मे महिन्याच्या अखेरीस खुली करण्याच्या दृष्टीने कामाची गती वाढविण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिल्याने पावसाळ्यात कळवेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे.

शहरातील स्वच्छता, साफसफाई कामाला प्राधान्य देत महापालिका आयुक्त डॉ .विपिन शर्मा यांचा दैनंदिन पाहणी दौरा सुरूच असून आज कळवा परिसरातील विविध भागांना भेटी देवून रेतीबंदर घाट, सुशोभिकरण, रस्ते आणि साफसफाई कामाची पाहणी केली. या परिसरातील मुख्य नाल्याची रुंदी वाढविणे, फुटपाथची दुरुस्ती, दुभाजकाची दुरुस्ती व रंगरंगोटी वेळेत करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

कळवा येथील ब्रिटिश कालीन पूल धोकादायक झाला तर दुसऱ्या पुलावर वाहतूक कोंडी वाढल्याने महापालिकेने तिसरा पूल बांधून काळवेकारांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याचा निर्णय घेतला होता त्याकरिता स्मार्ट सिटी अंतर्गत त्याकरिता८०कोटी पेक्षा जास्त रकमेची तरतूद केली होती डिसेंम्बर अखेर हा पूल वाहतुकी करता खुला करण्यात येणार होता परंतु कोरोना मुळे कामाची गती मंदावली होती त्यामुळेच हे काम वेळेवर पूर्ण होऊ शकले नाही आत्ता मे अखेरीस त्याची एक मार्गिका खुली करण्याबाबत महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

महापालिका आयुक्त डॅा. शर्मा यांनी रेतीबंदर गणेश विसर्जन घाट, आत्माराम पाटील चौक, रेतीबंदर खारेगाव रोड, साईनाथ नगर, सह्याद्री स्कूल, कळवा चौक, आदी ठिकाणांची पाहणी केली. या दौऱ्यामध्ये महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देत रस्त्यांची नियमित साफसफाई, रस्ते दुरुस्ती, रंगरंगोटी, फुटपाथ साफ ठेवणे आदी कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

यावेळी पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी साईनाथनगर येथील मुख्य नाल्याची रुंदी वाढविणे, सह्याद्री स्कूल येथील फुटपाथची दुरुस्ती, मुख्य ररस्त्यावरील दुभाजकाची दुरुस्ती व रंगरंगोटी, दुभाजकांमध्ये झाडांची लागवड व देखभाल करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी कळव्यातील कै. मुकुंद केणी क्रीडा संकुलाची देखील पाहणी करून आढावा घेतला.

दरम्यान महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला भेट देवून तेथील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी हॉस्पिटलची किरकोळ दुरुस्ती व रंगरंगोटी करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

या पाहणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, उप आयुक्त मनीष जोशी, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, उप नगर अभियंता विनोद गुप्ता, सहाय्यक आयुक्त समीर जाधव, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, मनोज तायडे, धनाजी मोदे, विकास ढोले, महेश अमृतकर, वरिष्ठ उद्यान अधिक्षक केदार पाटील, आगर व्यवस्थापक दिलीप कानडे तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते.