कोणत्याही शहराच्या उत्तम व्यवस्थेत शिस्तीचा भाग महत्त्वाचा असतो. मोठ्या माणसांना शिस्त लावण्याचे काम विद्यार्थी करू शकतात. वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा आग्रह पाल्यांनी धरला तर पालक अधिक सुरक्षितपणे वाहने चालवतील आणि अपघात टळतील, असे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड म्हणाले.
वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे आणि नागरीकांचे सहकार्य मिळाले तर पोलिसांचे काम सोपे होईल, असे सांगून त्यांनी ठाणे व्हिजन-२०३० उपक्रमाचे कौतुक केले. अशा उपक्रमांतून हा विचार पुढे मांडला जाईल, असे ते म्हणाले.
२० वर्षांत वाहने चौपट वाढली, लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली, ठाण्यातील रस्ते मात्र तेवढेच राहिले आहेत. त्यात सुरू असलेल्या विकास कामांमुळे वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत असल्याचे श्री. राठोड यांनी स्पष्ट केले.
मुंबईत ४५०० वाहतूक अधिकारी-कर्मचारी आहेत. त्या मुंबईच्या लगत असलेल्या वाढत्या ठाण्यात फक्त ६५० कर्मचारी आहेत. शहरात वाहतुकीची समस्या आहे, यात वाद नाही. एखादी गाडी बंद पडली तर त्याचा परिणाम मागील काही किमी अंतरावरील वाहतुकीवर पडतो. अनेक विकासकामे सुरू आहेत, त्याचाही परिणाम वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीत वाहतूक कर्मचारी काम करत आहेत. कधीतरी त्यांचे कौतुक करा, म्हणजे त्यांच्या कामात आणखी उत्साह दिसेल, अशी अपेक्षा श्री.राठोड यांनी व्यक्त केली.
वाहतूक सुरू आहे याचा अर्थ यंत्रणा सक्षमपणे कार्यान्वित आहे, पण काही मिनिटे वाहतूक थांबली तर थोडी अडचण निर्माण झाली असावी असे समजावे. या वाढत्या शहरात वाहतूक नियमन करणे आव्हानात्मक असले तरी कर्मचारी प्रामाणिकपणे काम करताना दिसतात, नागरिकांनाही त्रास होत आहे, मात्र पुढील एक-दोन वर्षांत या परिस्थितीत अमुलाग्र बदल झालेला दिसेल, असा विश्वास श्री.राठोड यांनी व्यक्त केला. तर आईवडील, नातेवाईक, मित्र यांना हेल्मेट घालायला सांगा, सीट बेल्ट लावायला सांगा वाहतूक नियमांचे पालन करायला सांगा असे आवाहनही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.