शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांचे भाजपला प्रत्युत्तर
ठाणे : ठाणे महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर कंटेनर शाखा उभारण्यावरून एकीकडे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी शिवसेनेला (शिंदे गट) लक्ष्य केले असताना आता शिवसेनेच्या आमदारांनीही भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.
कंटेनर शाखा या नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी उभारल्या जातात. कंटेनर शाखा म्हणजे अनधिकृत बांधकाम नसल्याचे प्रत्युत्तर आमदार प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. जर ही शाखा आरक्षित भूखंडावर असेल तर त्याची माहिती घेण्यात येईल मात्र नागरिकांना त्रास होत असेल आणि नागरिकांच्या तक्रारी आल्या तरच शाखा काढू अशी भूमिका सरनाईक यांनी घेतली असल्याने या कंटेनर शाखेवरून आता वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत.
धर्मवीरनगर येथील तुळशीधाम भागात ठाणे महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे, असा आरोप भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी केला होता. २०२१ साली याच जागेवर कपाऊंड टाकुन लोकोपयोगी मुलभूत सोईसुविधांसाठी वापर करण्याची सूचना श्री.केळकर यांनी केली होती. महापालिकेनेही या ठिकाणी स्वतःचा फलक लावुन अतिक्रमण न करण्याचे निर्देश दिले होते. तरीही २४ जानेवारी रोजी या ठिकाणी भलामोठा कंटेनर ठेवुन २७ जानेवारी रोजी त्या कंटेनरवर झेंडा व फलक झळकवण्यात आल्याचे श्री. केळकर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निदर्शनास आणून दिले. अशाप्रकारे राजरोसपणे अतिक्रमण करण्याची इतकी हिंमत होतेच कशी ? तेव्हा, तातडीने ही अनधिकृत कंटेनर शाखा हटवावी, अन्यथा याच ठिकाणी दोन प्रतिकात्मक कार्यालये थाटण्याचा इशारा आ. केळकर यांनी दिला होता.
एकीकडे प्रतिकात्मक कार्यालये उभारण्याचा इशारा आमदार केळकर यांनी दिला असला तरी, दुसरीकडे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मात्र या कंटेनर शाखेबाबत स्पष्ट भूमिका व्यक्त केली आहे. कंटेनर शाखा म्हणजे अनधिकृत बांधकाम नव्हे, या ठिकाणी नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी जाऊन घेतल्या जातात. आमदार केळकर यांच्या मतदारसंघातील धर्मवीर नगर हा भाग माझ्या मतदार संघाला लागून आहे. त्यामुळे यामध्ये अतिक्रमण झाले आहे कि नाही याबाबत माहिती घेतली जाईल, मात्र नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतरच याबाबत विचार केला जाणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या दोन गटातील शाखेचा वाद आता भाजप विरोधात शिवसेना (शिंदे गट ) असा रंगला असल्याचे चित्र सध्या ठाणे शहरात पाहायला मिळत आहे.