शहापूरमध्ये हवालदाराने स्विकारली ३० हजारांची लाच

ठाणे : ठाणे ग्रामीण पोलिसांच्या अंतर्गत असलेल्या शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संतोष मोरे (45) यास लाचलुचपत विरोधी पथकाच्या ब्युरोच्या ठाणे विभागाने 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले.

या घटनेतील तक्रारदार यांच्यावर शहापूर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना मदत करण्यासाठी लोकसेवक संतोष मोरे यांनी तक्रारदार यांच्याकडे 40 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. मात्र तडजोडीच्या अंती 30 हजार रुपये लाचेच्या रकमेचा स्वीकार करणार असल्याचे 17 ऑक्टोबर रोजी केलेल्या पडताळणी कारवाईत निष्पन्न झाले आहे.

त्या अनुषंगाने 19 ऑक्टोबर 23 रोजी केलेल्या सापळा कारवाईमध्ये लोकसेवक मोरे यांना शहापूर पोलीस स्टेशनच्या आवारात सकाळी 11.23 वाजता लाचेची रक्कम 30 हजार रुपये स्वीकारली असताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई शहापूर पोलीस स्टेशन येथे करण्यात येत आहे.

याप्रकरणी मार्गदर्शन अधिकारी ठाणे लाचलुचपत परिक्षेत्राचे सुनील लोखंडे यांनी केले आहे. भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास किंवा लाच मागणा-या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास ठाणे परिक्षेत्राच्या अँटी करप्शन ब्युरोशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे यांनी केले.