भाईंदर : पालकांनी अनेक वेळा इमारतीच्या गच्चीवर जाण्यापासून रोखले असतानाही पतंगाच्या नादाने कुणाचेही न ऐकता गच्चीवर गेलेल्या अकरा वर्षीय हमजा कुरेशीला जीव गमवावा लागला.
तिसऱ्या मजल्यावरील गच्चीवर पतंग पकडण्यासाठी गेलेल्या हमजाचा तोल गेला आणि दोन इमारतींच्यामधील मोकळ्या जागेत जमिनीवर कोसळला. नयानगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
मकर संक्रांतीनंतर सुरू झालेल्या पतंग उडविण्याचा कार्यक्रम अद्यापही मीरा रोडमध्ये सुरू आहे. दोन पतंगाच्या काटछाटनंतर खाली येणाऱ्या पतंगासाठी जीवही पणाला लावणाऱ्या मुलांसह तरुणही धावपळ करीत आहेत.
मीरारोड नयानगर परिसरातील सरयू अपार्टमेंटमधील सी विंग च्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या हमजा कुरेशीलाही पतंग पकडण्याचा मोह आवरला नाही. यासाठी तो लगतच्या बी व ए विंगच्या गच्चीवर जायचा. याबाबत अनेकांनी त्याला गच्चीवर जाण्यास मनाई केली होती. मात्र इमारतीच्या परिसरात खेळत असताना अचानक एक पतंग गच्चीवर येत असल्याचे दिसल्याने हमजाने गच्चीवर जाऊन पतंग पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा अंदाज चुकला आणि तो बी व ए विंग इमारतीच्या मोकळ्या जागेतील जमिनीवर कोसळला.
लगतच्या रहिवाशांनी हमजाला पालिकेच्या पंडित भीमसेन जोशी इस्पितळात नेले. मात्र डोक्याला झालेल्या जबर जखमेमुळे त्याचा मृत्यू झाला.