उत्सव विचार, संघर्ष, समर्पण आणि कार्यकर्त्यांच्या सामर्थ्याचा

भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस हा केवळ एका राजकीय पक्षाचा वर्धापन दिन नसून, सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर उभ्या राहिलेल्या विचारसंपन्न आणि राष्ट्रनिष्ठ प्रवासाचा गौरव करणारा दिवस आहे. १९८० मध्ये सुरू झालेली ही वाटचाल आज देशाच्या राजकारणात नवे मापदंड निर्माण करणारी ठरली आहे. कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी ठेवणारी रचना, घराणेशाहीला ठाम नकार आणि कर्तृत्वावर आधारित नेतृत्वाची परंपरा, या वैशिष्ट्यांमुळे भाजपची ओळख वेगळी ठरते.
या प्रवासाकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, हा पक्ष केवळ सत्ताकेंद्रित नसून विचारकेंद्रित आहे. सामाजिक परिवर्तन, राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वसमावेशक विकास साधत कार्यकर्त्यांना सक्षम करणे, हा त्याचा मुख्य आधार राहिला आहे.
“सामान्यांच्या परिश्रमातून घडलेला हा प्रवास,
विचारांच्या भक्कम पायावर
उभारलेला विश्वास घराणेशाहीला नाकारत, कर्तृत्वाला दिला मान,
कार्यकर्त्यांच्या बळावर उभा
देशाचा अभिमान ||
६ एप्रिल १९८० रोजी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या या पक्षाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आपली वाटचाल सुरू केली. १९८४ मध्ये केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले, तरीही खचून न जाता पक्षाने आपल्या विचारांवर ठाम राहून संघटन मजबूत केले. आज केंद्रात आणि अनेक राज्यांत स्वबळावर सत्ता मिळवून, जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उभा राहणे हा या प्रवासाचा अभिमानास्पद टप्पा आहे.
या कालखंडात पक्षाने केवळ निवडणुका जिंकण्यावर भर न देता, तळागाळात विचार पोहोचवणे आणि संघटन विस्तार यावर अधिक लक्ष केंद्रित केले. यामुळेच प्रतिकूलतेतही पक्ष अधिक सक्षम होत गेला. भाजपची सर्वात मोठी ताकद म्हणजे कार्यकर्त्यांवर आधारित रचना आणि घराणेशाहीपासून दूर असलेली कार्यसंस्कृती. येथे व्यक्तीचे स्थान त्याच्या कुटुंबामुळे नव्हे, तर त्याच्या कर्तृत्वामुळे ठरते. त्यामुळे सामान्य घरातून आलेल्या कार्यकर्त्यालाही नेतृत्वाची संधी मिळते – हीच खरी लोकशाहीची ताकद आहे.
“ना वंश, ना वारसा, कर्तृत्वच ओळख इथे । सामान्य कार्यकर्त्यांच्या
सृजनशीलतेला वाव इथे || “
याचे जिवंत उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. अत्यंत साध्या कुटुंबातून आलेले मोदी यांनी कार्यकर्त्यापासून सुरुवात करत देशाचे सर्वोच्च नेतृत्व गाठले. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘जनधन योजना’, ‘स्वच्छ भारत अभियान’, ‘उज्ज्वला योजना’ आणि ‘आयुष्मान भारत’ यांसारख्या उपक्रमांमुळे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला आहे. ‘आत्मनिर्भर भारत’, डिजिटल अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळे देशाच्या प्रगतीला नवे बळ मिळाले आहे.
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी देखील याच कार्यकर्त्यांच्या परंपरेला न्याय दिला आहे. एक तरुण आणि अभ्यासू नेता म्हणून त्यांनी प्रशासनात पारदर्शकता, वेगवान निर्णयप्रक्रिया आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यांचा संगम घडवला. “जलयुक्त शिवार अभियान”, “समृद्धी महामार्ग”, मुंबई मेट्रो यांसारख्या प्रकल्पांमुळे राज्याच्या विकासाला गती मिळाली. तसेच, त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील कोस्टल रोडसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात आला, जो केवळ वाहतूक कोंडी कमी करण्यापुरता मर्यादित नसून, शहराच्या सर्वांगीण विकासाला नवे परिमाण देणारा ठरत आहे.
समुद्रकिनाऱ्यालगत उभारण्यात आलेल्या या मार्गामुळे उत्तर-दक्षिण मुंबईमधील प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होत असून, इंधन बचत, प्रदूषणात घट आणि वाहतूक व्यवस्थेतील सुसूत्रता यांना लागत आहे. भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा विचार करून उभारण्यात आलेला हा प्रकल्प मुंबईच्या शाश्वत शहरी नियोजनाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरत आहे. त्यांच्या निर्णयक्षमतेमुळे आणि प्रशासनातील समन्वयामुळे विकासकामांना गती मिळाली असून, दीर्घकालीन पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या दूरदृष्टीमुळे नागपूर, पुणे आणि मुंबई येथे मेट्रो प्रकल्प यशस्वीपणे उभे राहत आहेत आणि अनेक मार्गांवर मेट्रो धावत आहे. नागपूर मेट्रोने शहरातील सार्वजनिक वाहतुकीला नवी दिशा दिली, तर पुणे आणि मुंबई मेट्रोमुळे दैनंदिन प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा झाला आहे. मेट्रोच्या विस्तारीकरणाची कामेही वेगाने सुरू असून, शहरांच्या वाढत्या गरजांनुसार नवीन मार्ग विकसित केले जात आहेत. या प्रकल्पांमुळे रस्त्यांवरील ताण कमी होत असून, पर्यावरणपूरक आणि आधुनिक वाहतूक व्यवस्था निर्माण होत आहे. मेट्रोमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येत आहेत. कामकाजाची कार्यक्षमता वाढवणे, वेळेचे व्यवस्थापन सुधारणे आणि शहरी अर्थव्यवस्थेला गती देणे- या सर्व बाबींमध्ये मेट्रो महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
महाराष्ट्रातील संघटनात्मक बळकटीत रवींद्र चव्हाण यांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय ठरले आहे. तळागाळाशी घट्ट नाळ जोडून कार्य करणारे, कार्यकर्त्यांमध्ये सतत संवाद आणि विश्वास निर्माण करणारे नेतृत्व म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. एक कुशल संघटक म्हणून त्यांनी केवळ निवडणुकीपुरते नियोजन न करता, दीर्घकालीन संघटन विस्तारावर सातत्याने भर दिला आहे. विशेषतः कोकण विभागात त्यांनी पक्षाची मुळे अधिक घट्ट करत भाजपला मजबूत आणि प्रभावी पर्याय म्हणून उभे केले. गाव, बूथ आणि विभाग स्तरावर कार्यकर्त्यांचे जाळे सक्षम करत, प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षाशी जोडून ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले आहे. त्यांच्या नियोजनबद्ध रणनीती, सातत्यपूर्ण संवाद आणि कार्यकर्त्यांना दिलेल्या प्रोत्साहनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला लक्षणीय यश मिळाले आहे.
रवींद्र चव्हाण यांची कार्यशैली ही केवळ नेतृत्वापुरती मर्यादित नसून, ती कार्यकर्त्यांना सक्षम करणारी आणि त्यांना पुढे आणणारी आहे. नव्या कार्यकर्त्यांना संधी देणे, त्यांच्या क्षमतांचा विकास करणे आणि संघटनात नवी ऊर्जा निर्माण करणे या बाबींवर त्यांनी विशेष भर दिला आहे. त्यामुळे पक्षाचा विस्तार अधिक वेगाने आणि व्यापक पद्धतीने होताना दिसतो.
त्यांच्या नेतृत्वाखाली संघटन अधिक सुसूत्र, शिस्तबद्ध आणि परिणामकारक बनले असून, तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास आणि प्रेरणा निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष अधिक मजबूत करण्याची त्यांची भूमिका हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ताकद ठरते.
भाजपची विचारधारा ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ आणि ‘एकात्म मानवदर्शन’ यावर आधारित आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांनी या पक्षाला दिशा दिली. ‘अंत्योदय’–म्हणजे समाजातील शेवटच्या घटकाचा विकास – हीच या विचारधारेची मुख्य ओळख आहे. संघटनशक्ती, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि सेवा भाव हे भाजपाचे खरे बलस्थान आहे. बूथ स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत कार्यरत असलेले मजबूत नेटवर्क आणि जनतेशी सातत्यपूर्ण संपर्क यामुळे पक्ष अधिक प्रभावी ठरतो.
या प्रवासामागे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे निरपेक्ष समर्पण हेच खरे बळ आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता समाज आणि राष्ट्रासाठी कार्य करणाऱ्या या कार्यकर्त्यांमुळेच पक्ष आज या उंचीवर पोहोचला आहे.
भाजपाचा स्थापना दिवस हा केवळ उत्सव नाही, तर नव्या संकल्पाचा दिवस आहे- ‘राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय, व्यक्ती शेवटी या मूल्यांची पुनः प्रतिज्ञा करण्याचा दिवस आहे.
संघर्षातून उभा राहून, कार्यकर्त्यांच्या बळावर विस्तारलेला भारतीय जनता पक्ष आज एक विशाल वटवृक्ष बनला आहे. विचारांची भक्कम पायाभरणी, सक्षम नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची अथक मेहनत यांच्या जोरावर ‘विकसित भारत’ घडवण्याचा प्रवास अविरत सुरू आहे.
-निरंजन डावखरे
सदस्य: कोकण पदवीधर मतदार संघ, सरचिटणीस: भाजपा महाराष्ट्र प्रदेश