पर्यटन व्यवसायिकांसाठी पर्यटनाचा हंगाम म्हणजे केवळ व्यवसाय नसून तो वर्षभराच्या मेहनतीचा उत्सव असतो, पण आज याच उत्सवाच्या जागी अगतिकता आणि शांतता पसरली आहे.
कुठेतरी दूरवर गोळीबार होतो, कुठेतरी बॉम्बस्फोट होतो किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती येते; टीव्हीवरच्या बातम्या बदलतात, लोक हळहळतात आणि विसरून जातात. पण या एका बातमीच्या मागे शेकडो पर्यटन व्यावसायिकांचे संसार कसे उद्ध्वस्त होतात, हे कधी कोणापर्यंत पोहोचतच नाही. पहलगामच्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा तोच भयावह अनुभव समोर येत आहे. पर्यटकांना सुखरूप परत आणण्यापासून ते त्यांच्या पैशांच्या सुरक्षेपर्यंत अहोरात्र राबणाऱ्या या व्यावसायिकांच्या नशिबी मात्र आज केवळ शुक्लकाष्ट उरले आहे.
एखादी सहल रद्द होते, तेव्हा पर्यटन व्यावसायिक हा दोन टोकांच्या दबावाखाली असतो. एकीकडे एअरलाईन्स आणि हॉटेल सप्लायर्सकडून रिफंड मिळवण्यासाठी महिनोंमहिने होणारा संघर्ष आणि दुसरीकडे पर्यटकांचा ससेमिरा. दुर्दैव असे की, अनेकदा रिफंड मिळायला उशीर झाला की त्याच पर्यटकांकडून, ज्यांना आम्ही जीवापाड सेवा देतो, धमक्या मिळतात, वाद घालतात. सुशिक्षित म्हणवणारे ग्राहक चक्क पोलिसांचा धाक दाखवतात. पोलिसांची भूमिका तर त्याहूनही वेदनादायी असते; ट्रॅव्हल एजंट म्हणजे जणू फसवणूक करणारा गुन्हेगारच, अशा पूर्वग्रहाने त्यांना वागणूक दिली जाते. ३०-३१ वर्षे प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या एका व्यवसायिकासाठी ही मानहानी त्याच्या कष्टाच्या मृत्यूसारखीच आहे.
कोरोना काळापासून पर्यटन क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. दर चार-सहा महिन्यांनी काही ना काही घडते. बिझनेस छान चाललाय असं वाटतं न वाटतं तोच व्यवसाय मंदावतो. काही ना काही कारणाने हा व्यवसाय रोडावतो, बंद पडतो. जगासाठी पर्यटन बंद असते, पण व्यावसायिकासाठी बँकांचे हप्ते, ऑफिसचे भाडे आणि कर्मचाऱ्यांचे पगार कधीच थांबत नाहीत. वसुलीसाठी फायनान्स कंपन्या दारात उभ्या असतात. स्वतःचे घरदार उघड्यावर टाकून, पदरचे पैसे खर्च करून पर्यटन चक्र सुरू ठेवणाऱ्या या घटकाला काय सोसावे लागते, याची कल्पना वातानुकूलित केबिनमध्ये बसलेल्या सरकारला आणि सामान्य जनतेला कधी येणार?
आज या व्यवसायाला ना उद्योगाचा दर्जा आहे, ना कोणतेही कायदेशीर संरक्षण. ज्याला इच्छा होईल तो उठतो आणि (रिटायर्ड माणसे) सहली काढू लागतो. अननुभवी लोकांमुळे आणि अवैध स्पर्धेमुळे या क्षेत्राची शिस्त बिघडली आहे. सहल रद्द झाल्यावर ग्राहकाने कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत, याचे कोणतेही कायदे नाहीत. वादळ-वारं आलं, नुकसान झालं तर मदत मिळते, सहानुभूती असते पण पर्यटकाला सरकारकडून कोणतीही मदत नाही. मायबाप सरकारचा फक्त टॅक्सशिवाय अन्य कोणताच संबंध नाही, असं वाटायला लागतं. पर्यटन मंत्रालयाची धुरा अशा लोकांकडे सोपवली जाते, ज्यांना या क्षेत्रातील सूक्ष्म बारकाव्यांची आणि संकटांची पुसटशी जाणीवही नसते. ही असंवेदनशीलता आता असह्य झाली आहे.
आज सोशल मीडियाच्या एका चुकीच्या कॉमेंट्समुळे, रिव्ह्यूमुळे दशकानुदशकांची प्रतिष्ठा, मेहनत धुळीला मिळवली जाते. आम्ही केवळ ‘तिकीट विकणारे दलाल’ नसून आम्ही ‘आठवणी निर्माण करणारे प्रोफेशनल’ आहोत, आपली सेवा व काळजी घेणारे आहोत हे समाज कधी समजून घेणार? जर भविष्यात हे पर्यटन, हे ट्रॅव्हल प्रोफेशनल संपवायचेच असेल, तर सरकारला आमचे काहीच म्हणणे नाही. पण जर हे क्षेत्र (टुरिझम) जिवंत ठेवायचे असेल, तर अगदी पायापासून याची फेरबांधणी होणे आवश्यक असल्याचे मत व्यावसायिक व्यक्त करत आहेत.
हा केवळ एका व्यावसायिकाचा टाहो नाही, तर ज्यांनी आपल्या आयुष्यातील उमेदीची वर्षे पर्यटकांच्या सुखासाठी वेचली, त्या प्रत्येकाचे हे सामूहिक शल्य आहे. सरकारने आणि समाजाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर भविष्यात केवळ रोबोटिक वेबसाईट्स (online)उरतील, माणसाची सुरक्षितता आणि माणुसकी जपणारा ‘ट्रॅव्हल प्रोफेशनल’ कायमचा लुप्त होईल, अशी भीती व्यावसायिक व्यक्त करत आहेत.