ओवळे येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात

ठाणे: घोडबंदर रोड, ठाणे परिसरातील ओवळे गाव येथे स्थित असलेले कै. रतनशी प्रेमजी यांनी स्थापन केलेले श्री वरदेश्वर हनुमान मंदिर हे जागृत देवस्थान असून येथे गुरुवार २ एप्रिल, २०२६ रोजी रतनशी प्रेमजी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सव  उत्साहात साजरा करण्यात आला.
उत्सवाची सुरुवात पहाटे ६ वाजता हनुमान कीर्तनाने झाली. सूर्यादयाच्या शुभमुहूर्तावर श्री हनुमान जन्मोत्सव विधीपूर्वक साजरा करण्यात आला. सकाळी ११ वाजता श्री राम समर्थ भजनी मंडळ यांचे भजन व कीर्तन झाले, तर दुपारी ३ वाजता मारुती महिला मंडळ यांच्या वतीने भजन-कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ५.३० वाजता श्री वरदेश्वर हनुमानाच्या दर्शनमूर्तीची भव्य पालखी काढण्यात आली. यावेळी ग्रामप्रदक्षिणा करण्यात येत भक्तांनी मोठ्या श्रध्देने सहभाग नोंदविला. संपूर्ण परिसर “जय हनुमान” च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.
या कार्यक्रमास रतनशी प्रेमजी चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त निखिल माखेचा, विश्वस्त स्नेहा माखेचा, विश्वस्त उमंग माखेचा, उपस्थित होते. त्यांनी श्री वरदेश्वर हनुमानाच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. यावेळी शेकडो ग्रामस्थ, राजकीय नेते, कार्यकर्ते यांनी दर्शनाचा लाभ घेतला.