समीर वानखेडे यांच्यावर कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे : एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर आणि आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होत आहे. आता महाराष्ट्राच्या उत्पादन शुल्क विभागाने वानखेडेवर गुन्हा दाखल केला आहे. समीर वानखेडे याने फसवणूक करून सद्गुरू हॉटेल अँड बारचा परवाना घेतल्याचा आरोप आहे. यापूर्वी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून त्यांचा परवाना रद्द करण्यात आला होता.

ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरनुसार, वानखेडे यांनी वयाची खोटी माहिती देऊन हॉटेल आणि बारचा परवाना घेतला होता. 1996-97 मध्ये ते 18 वर्षाखालील होते आणि परवान्यासाठी पात्र नव्हते. असे असतानाही त्याने ठाण्यातील सद्गुरू हॉटेलच्या करारात मेजर असल्याचा दावा केला होता.

1997 मध्ये समीर वानखेडे यांच्या सद्गुरू हॉटेलसाठी दाखल केलेल्या परवाना अर्जात वय चुकीचे दाखवण्यात आले होते. ठाण्याचे उत्पादन शुल्क अधीक्षक आणि वानखेडे यांच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर हॉटेलचा परवाना रद्द करण्याचा सहा पानी आदेश देण्यात आला. या बारला मद्यविक्रीची परवानगी होती.

कारवाई का करण्यात आली?

जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीत वानखेडे यांनी २७ ऑक्टोबर १९९७ रोजी हॉटेल आणि बारचा परवाना घेतल्याचे निष्पन्न झाले. परवाना मिळविण्यासाठी वयाची २१ वर्षे आवश्यक होती, परंतु वानखेडे यांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याने त्यांचा परवाना रद्द करण्यात आला.