शिंदे गटाविरोधात बॅनर
ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या विरोधात ५० खोके, माजले बोके अशा उल्लेखाचे बॅनर लावणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक अध्यक्षासह पाच जणांच्या विरोधात नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शहरातील अरुण कुमार वैद्य मार्ग, महापालिका मुख्यालय आणि मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या लुईसवाडी येथील निवासस्थानाजवळ ५० खोके एकदम ओके, भूखंडाचे श्रीखंड आदी उल्लेखाचे बॅनर अनधिकृतपणे लावण्यात आले होते. त्याबाबत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे समन्वयक महेश आहेर यांनी हे बॅनर काढून बेकायदेशीर बॅनर लावणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. नौपाडा पोलिसांनी देखिल तक्रारीची गंभीर दखल घेऊन आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रम खामकर, अभिजित पुसाळकर, गणेश टोकडे, उमेश कांबळे आणि चेतन गंभीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी हालचाली करून गणेश टोकडे, उमेश कांबळे आणि चेतन गंभीर यांना दुपारी ताब्यात घेतले तर विक्रम खामकर आणि अभिजित पुसाळकर यांना संध्याकाळपर्यंत अटक करण्यात आली नव्हती.