* शोकसभेत खासदार नरेश म्हस्के यांचे आश्वासन
* सतीश प्रधान यांना विविध क्षेत्रातील मंडळींकडून श्रद्धांजली
ठाणे: ठाणे शहराला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवण्याचे काम सतीश प्रधान यांनी केले. त्यामुळे ठाण्यात सतीश प्रधान यांच्या नावाची वास्तू उभारणार असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले. तर प्रधान यांनी ठाण्याला ओळख निर्माण करून दिल्याची प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी दिली आहे.
ज्ञानसाधना महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेमध्ये सतीश प्रधान यांना विविध क्षेत्रातील मंडळींनी श्रद्धांजली वाहिली.
आपल्या भावना व्यक्त करताना नरेश म्हस्के म्हणाले, शहाराची उंची त्या शहरात असलेल्या उंच इमारतींवरुन किंवा शहरातील श्रीमंत माणसांवरुन ठरत नाही तर, त्या शहरात असलेले संस्कार, शहरात असलेले स्टेडियम, नाट्यगृह, महाविद्यालय, तरण तलाव, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील वास्तू, ग्रंथालये यावरुनच ठरत असते. या ठाणे शहराला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनविण्याचे काम सतिश प्रधान यांनी केले. त्यामुळे या ठाणे शहरात सतिश प्रधान यांच्या नावाची वास्तू उभारण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
आमदार निरंजन डावखरे हे भावना व्यक्त करताना म्हणाले की, असे कोणतेही क्षेत्र नाही, ज्याला प्रधानांचा स्पर्श झालेला नाही. प्रधान हे ठाण्यातील नेतृत्वाचे शेवटचे तारे होते. माजी खासदार आनंद परांजपे यांनी सतिश प्रधान यांच्या राजकीय क्षेत्रातील काही आठवणी सांगितल्या. प्रधान यांचे ठाण्यातील भरीव कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल असेही ते म्हणाले. प्रधान यांनी ठाण्याला ओळख निर्माण करून दिली. ठाणे शहर हे नेहमीच उपक्रमशील राहण्यासाठी सर्व क्षेत्रात त्यांनी योगदान दिले. ते शिवसेनेमधील कार्य करताना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे असायचे, असे ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई म्हणाले. या शोकसभेत लेखक प्रवीण दवणे, ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे, नाट्य दिग्दर्शक अशोक समेळ तसेच सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रधान यांच्या योगदानाची आठवण करून दिली.
यावेळी प्रधान यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते. अशी प्रतिक्रिया उबाठा पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी दिली आहे. सतीश प्रधान यांनी शहर घडवणाऱ्या वास्तू दिल्या, तसेच ज्ञानसाधनाची स्थापना करून नवीन पिढी घडवण्याचे मोठे काम केले, असे ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ म्हणाले. नगराध्यक्ष आणि महापौर म्हणून त्यांनी शहरावर पूर्ण नियंत्रण मिळवले आणि अनेक नेते घडवण्याची मोलाची कामगिरी बजावली, असेही ते म्हणाले.