ठाणे : दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी महिलांकडून 24 हजार रुपयांची मागणी करणाऱ्या आणि तडजोडी अंती 18 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस हवालदारास ठाणे एसीबी पथकाने गुरुवारी कल्याणमधून अटक केली.
धनंजय फरडे (48) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. तो कल्याण तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. या घटनेतील तक्रारदार महिला असून त्यांच्यावर ठाणे ग्रामीण पोलिसांच्या कल्याण तालुका पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार धनंजय लक्ष्मण फरडे यांच्याकडे होता. दरम्यान, या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी धनंजय याने तीन महिलांकडून प्रत्येकी आठ हजार अशा एकूण 24 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोडी अंती ही रक्कम प्रत्येकी सहा हजार असे एकूण 18 हजारात ठरली.
या प्रकरणी महिलांनी ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक पथक ठाणे कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर गुरुवारी दुपारी कल्याण येथे एसीबी पथकाने सापळा लावून पोलीस हवालदारास 18 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी कल्याण तालुका पोलिसात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.