हाताच्या ठशावरून अडीच वर्षे बेपत्ता मुलगा परतला स्वगृही

ठाणे : ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने मध्यप्रदेशातून बेपत्ता झालेल्या एका मुलाला सव्वा दोन वर्षांनी त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले आहे. मुलाच्या घरचा कोणताच ठावठिकाणा नसताना, मनोरुग्णालयाने मुलाचा आधारकार्ड क्रमांक शोधून मुलाची आणि पालकांची भेट घडवून आणली.

या मुलाच्या मानसिक स्वास्थ्याची रुग्णालयातर्फे आजही विचारपूस करण्यात येते. सलीम खान (नाव बदलून) हा अल्पवयीन मुलगा कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरत असताना दिसला. मानसिक आजारी असल्याने चाईल्ड वेल्फेअर कमिटी आणि कासारवडवली पोलिसांनी ऑगस्ट २०२२ मध्ये सलिमला ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. हा मुलगा कुठून आला याची कोणतीच माहिती मिळत नव्हती. त्यामुळे सलीमच्या कुटुंबीयांना शोधायचे कसे हा प्रश्न रुग्णालयाला होता.

रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली सलीमवर मानसिक उपचार आणि त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू होते, अशी माहिती रुग्णालयाच्या समाजसेवा अधिक्षक स्वाती कुळकर्णी यांनी दिली. सुरुवातीचे काही दिवस सलीम कुठून आला आहे याचा उलगडा होतच नव्हता. नाव देखील काही वेगळच सांगत होता. कधी मुंब्रा येथे राहत असल्याचे बोलत होता. त्यानुसार रुग्णालयाने मुंब्र्यात जाऊन चौकशी केली होती. मात्र काहीच उपयोग झाला नाही. जुलै २०२४ मध्ये रुग्णालयातील रुग्णांची कापूरबावडी आधारकार्ड केंद्राच्या मदतीने आधारकार्ड तपासणी मोहीम राबवण्यात आली. त्यावेळी सलीमच्या बोटाच्या ठशावरून त्याच्या घरचा पत्ता मिळाला. मध्यप्रदेशातील उज्जैन आणि बंदनगर पोलिसांशी संपर्क रुग्णालयाने केला आणि त्याच्या कुटुंबीयांचा पत्ता शोधला.

दरम्यानच्या काळात सलीमवर समुपदेशन, ग्रुप थेरपी आणि औषधोपचार देण्याचे काम सुरू होते. त्याचे मानसिक स्वास्थ्य हळूहळू सुधारत होते. यासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दिवेकर, मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिक सुरेश भिलारे, कापूरबावडी आधार कार्ड केंद्राचे शंभू साह, शेखर पडवळ, चंद्रदेव यादव आदींनी अथक परिश्रम घेतले.

सलीमच्या कुटुंबीयांशी संपर्क झाल्यावर मोबाईल व्हिडिओ फोनद्वारे सलीम आपल्या घरच्यांशी मनमोकळे बोलत होता. आपल्या मुलाला शोधण्यासाठी कुटुंबीयांनी देखील खूप प्रयत्न केले होते. रुग्णालयात सलीम याला घेण्यासाठी त्याचे नातेवाईक आले असता कुटुंबीयांना आनंदाश्रू आवरत नव्हते. सलीम जरी आपल्या घरी गेला असला, तरी आमचे समाजसेवा अधिकारी त्याच्या स्वास्थ्याची चौकशी करत असतात, अशी माहिती मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी दिली.