ओव्हरटेक करण्याच्या वादातून रक्तरंजित राडा; सहा जणांना अटक

भिवंडी :ओव्हरटेक करण्याच्या वादातून १८ जणांनी आपसात संगनमताने चौघांना बेदम मारहाण करून रक्तरंजित केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात १८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

जॉय पाटील, कामेश पाटील, उज्ज्वल, वैभव भोकरे, रुपेश म्हात्रे, निलेश भोकरे, सन्नी पाटील, सुनील पाटील, विराज पाटील, बंटी पाटील, देवेंद्र म्हात्रे, अजय पाटील, रुपेश भोकरे, स्वप्नील पाटील, राहुल पाटील आणि त्यांचे अन्य तीन साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. देवेंद्र ईताडकर, हेमंत ईताडकर, सागर ईताडकर, योगेश तरे अशी जखमींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २३ डिसेंबर रोजी ठाणे-भिवंडी रोडवरील काल्हेर येथील राजदीप ज्वेलर्सच्या समोर जखमी आणि आरोपींमध्ये ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर वादाचे रूपांतर भांडणात झाल्याने आरोपींनी आपसात संगनमत करून जखमींना ठोश्याबुक्क्यांनी, हॉकीस्टिकने आणि योगेश तरे याच्या डोक्यात झाडाची कुंडी घालून त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करीत गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी देवेंद्रच्या फिर्यादीवरून १८ जणांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात ३०७ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी यामधील सहा जणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. पुढील तपास सपोनि शरद पवार करीत आहेत.