ठाणे : कोपरी भागात बुधवारी महापालिका आयुक्तांच्या दौऱ्यादरम्यान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणारे बॅनर अतिक्रमण विभागाने उतरवले. यावर ठाकरे समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मात्र ही नियमित कारवाई असल्याचे सांगत पालिकेने आपले हात झटकले आहेत.
दरवर्षी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यासह जिल्ह्यात शुभेच्छा देणारे बॅनर लागत होते. यंदा मात्र त्याचे प्रमाण नगण्य झाल्याचे दिसून आले आहे. मंगळवारी कळवा आणि कोपरीत शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहेत. बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी येथील कोपरी विसर्जन घाटाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांच्या निर्दशनास हे बॅनर येताच त्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानंतर महापालिकेच्या संबंधित विभागाने देखील या बॅनरवर कारवाई केली.
या कारवाईबाबत शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली. बॅनर काढायचे होते, तर सर्वच काढणे अपेक्षित होते. अशी तत्परता सर्वच बाबतीत दाखविणे अपेक्षित होते, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. ठाणे महापालिकेने मात्र ही नियमित कारवाई असल्याचे सांगत आपले हात झटकले आहेत.