गॅस सिलेंडरच्या स्फोटात 65 वर्षीय व्यक्ती गंभीररीत्या जखमी

डोंबिवली : गॅस सिलेंडरच्या स्फोटात 65 वर्षीय व्यक्ती गंभीररीत्या भाजल्याची घटना डोंबिवली पश्चिमेकडील उमेश नगर परिसरात घडली आहे. जखमीला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हनुमंत मोरे असे जखमीचे नाव आहे.

डोंबिवली पश्चिमेकडील उमेश नगर देवीचा पाडा परिसरात राहणारे हनुमंत मोरे रविवारी पहाटे 3 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास कामावर जाण्यासाठी उठले. सकाळी आंघोळ वगैरे करून देवपूजेसाठी अगरबत्ती पेटवण्यासाठी लाइटर  पेटविण्यासाठी ते गेले असता सिलेंडरचा स्फोट झाला. यावेळी घरात असलेले हनुमंत मोरे हे जवळपास 40 टक्के भाजले असून त्यांना शेजाऱ्यांनी शासकीय रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्यांच्या मुलाला याची माहिती मिळताच त्यांनी मुंबईच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी त्यांना नेले असून त्यांचा उपचार खाजगी रुग्णाला सुरू केला आहे. हा सिलेंडरचा टाकीचा स्फोट इतका भीषण होता की या स्फोटात घराचे पत्रे तुटून उडाले तर स्वयंपाक घरातील बहुतांशी सामान जळाले दरम्यान या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असल्याची माहिती त्यांचा मुलगा श्रीनिवास मोरे व अग्निशामक दलाचे शिवाजी म्हात्रे, राजेश कासवे यांनी दिली.