लोणार अशनी विवराची वैशिष्ट्ये नष्ट होण्याच्या मार्गावर!

खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांची माहिती

ठाणे: बुलढाणा जिल्ह्य़ातील जगप्रसिद्ध लोणार अशनीविवराची वैशिष्ट्ये नष्ट होण्याच्या मार्गावर असून सरकारने त्याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज असल्याचे खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी ‘ आकाशाशी जडले नाते’या विज्ञान कट्ट्यावरील कार्यक्रमात सांगितले.

दा.कृ.सोमण यांची मुलाखत मेघना साने आणि प्रकाश बोरडे यांनी घेतली. एका प्रश्नाला उत्तर देताना श्री.सोमण म्हणाले की , 52 हजार वर्षांपूर्वी 60 मीटर लांबीचा, 20 लक्ष टन वजनाचा अशनीपाषाण बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे आदळला. तेथे सुमारे दोन किलोमीटर व्यासाचे, दीडशे मीटर खोल असे अशनीविवर तयार झाले आहे. या अशनी विवरात खारे पाणी असून त्या पाण्याचा पीएच साडेदहा आहे. जगातील अनेक विज्ञानप्रेमी आणि शास्त्रज्ञ या अशनीविवराला भेट देण्यासाठी येत असतात. सध्या कडक उन्हाळा असूनही या सरोवरातील पाणी अचानक वाढले आहे. सरोवरातील प्राचीन हेमाडपंथी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. पाण्याचा पीएचही बदलत आहे. लोणार सरोवराच्या जवळच अनेक लोकांनी बोअरवेल खोदल्यामुळे किंवा जवळच्या पाझर तलावामुळे कदाचित हे लोणार अशनीविवरातील पाणी हे वाढत असावे. सरकारने याकडे त्वरित लक्ष देवून कारवाई करावी असे आवाहन श्री.दा.कृ.सोमण यांनी केले.

मुलाखतीत सोमण यांनी अनेक प्रश्नाना उत्तरे दिली. पंचांग म्हणजे फलज्योतिष नव्हे, पंचांग म्हणजे खगोलगणित आहे हे त्यांनी स्पष्ट केले. आपली भारतीय कालगणना प्राचीन असून पंचांगाचा इतिहास त्यानी सांगितला. आपले सण-उत्सव हे ऋतूंवर आधारलेले आहेत. शरीराचे आणि मनाचे आरोग्य चांगले रहावे हा त्यामागचा उद्देश आहे. सन 2034 मध्ये काश्मीर येथून खग्रास सूर्यग्रहण दिसणार असल्याचे त्यानी सांगितले.

निलेश ठाकूर आणि त्यांचे बंधू गिरीश ठाकूर यांनी ठाणे जिल्ह्यातील पहिले तारांगण आणि आधुनिक मोठ्या दुर्बिणी असलेली वेधशाळा उभारली असून त्या प्रकल्पाचे उद्घाटन येत्या रविवारी 5 एप्रिल रोजी आपल्याहस्ते होणार असल्याचे श्री.दा.कृ.सोमण यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यात हा प्रकल्प निर्माण केल्याबद्दल ठाकूर बंधूंचे त्यांनी अभिनंदन केले. हा प्रकल्प पाहून ठाणे जिल्ह्यातून भावी शास्त्रज्ञ निर्माण होऊ शकतील. या मुलाखतीत पंचांग आणि खगोलशास्त्र विषयक प्रश्नांना दा.कृ.सोमण यांनी सविस्तर उत्तरे दिली.

प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी विज्ञान परिषद आणि नगरसेवक राजेश मोरे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती.