ठाणे: कधीकाळी शांत आणि मोकळ्या रस्त्यांसाठी ओळखला जाणारा कोपरी परिसर सध्या वाहनांच्या पार्किंगने गुदमरला आहे. प्रमुख रस्त्यांवर दुतर्फा वाहने उभी राहत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत असून, रस्ते वाहतुकीसाठी की पार्किंगसाठी, असा सवाल कोपरीकरांकडून उपस्थित होत आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील ठाणे पूर्वेचा कोपरी प्रभाग हा महत्त्वाचा आणि तुलनेने शांत परिसर म्हणून ओळखला जातो. मात्र द्रुतगती मार्ग, बारा बंगला, रेल्वे स्थानक, शाळा-महाविद्यालये, बँका व सरकारी कार्यालयांमुळे येथे दिवसभर मोठी वर्दळ असते. त्यातच जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला वेग आल्याने बांधकाम साहित्याची वाहतूक करणारी वाहने आणि वाढती वाहनसंख्या यामुळे कोपरीतील रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सॅटिस प्रकल्प राबविण्यात आला असला तरी प्रकल्पाच्या खालीच मोठ्या प्रमाणावर वाहने उभी राहत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी वाहतुकीसाठी उपलब्ध असलेली जागा कमी होत असून, वाहनचालकांना अरुंद मार्गातून वाट काढावी लागत आहे.
विशेषतः सिद्धार्थ नगर येथून बारा बंगला परिसराकडे जाताना सॅटिस खाली उभी असलेली वाहने आणि रस्त्यालगतचे पार्किंग वाहतुकीला अडथळा ठरत आहे. गर्दीच्या वेळेत या ठिकाणी वाहनांची संख्या वाढल्याने कोंडीची समस्या अधिक गंभीर होते. कोंडी सोडविण्यासाठी उभारलेल्या सॅटिस प्रकल्पाखालीच पार्किंगचा विळखा निर्माण झाल्याने प्रकल्पाच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोपरीतील अनेक प्रमुख रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर वाहने उभी राहत असल्याने पादचारी, दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची रुंदी कागदावर मोठी असली तरी प्रत्यक्षात पार्किंगमुळे वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी होत आहे.
याशिवाय परिसरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला वेग आल्याने आगामी काळात वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या पार्किंग व्यवस्थेचा फेरआढावा घेऊन भविष्यातील वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे झाले आहे.
महापालिकेने कोपरीतील प्रमुख रस्त्यांचे सर्वेक्षण करून अनियंत्रित पार्किंगला आळा घालावा, सॅटिसखाली वाहन उभे करण्याबाबत स्पष्ट व्यवस्था करावी आणि वाहतुकीसाठी रस्ते मोकळे ठेवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, या संदर्भात वाहतूक पोलिस शाखेकडून पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.