आ. संजय केळकर यांच्याकडून चौकशीची मागणी
ठाणे: ठाणे महापालिकेत विविध विभागांत हजारो कंत्राटी कामगार अनेक वर्षे काम करत असून त्यांच्या ग्रॅच्युईटी संदर्भात अनियमितता असून कोट्यवधींचा घोटाळा झालेला असण्याची शक्यता व्यक्त करत आमदार संजय केळकर यांनी कंत्राटदारांच्या कारभाराची आणि कथित घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
आमदार संजय केळकर यांनी कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांसह अनेक मागण्यांबाबत महापालिका मुख्यालयात सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह विविध विभागांतील उपायुक्त आणि कामगारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत आमदार केळकर यांनी कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. सातवा वेतन आयोगाचा १४ महिन्यांचा हप्ता महापालिकची आर्थिक स्थिती जशी सुधारत जाईल तशी ही रक्कम देण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेत कंत्राटदारांचे राज्य असल्याप्रमाणे कंत्राटदार वागत असून कामगारांना विमा योजना देण्यात आलेली नसल्याने त्यांचे भविष्य असुरक्षित झाले असल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले. याबाबत एक महिन्यात याबाबतची माहिती घेऊन विमा योजना राबविण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच लाड पागे समितीच्या अहवालानुसार फायलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांना देखील दोन आठवड्यात वारसा हक्काचा लाभ देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे मान्य करण्यात आले.
बैठकीत शिक्षण विभागातील दिवंगत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पात्र पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. इंग्रजी माध्यम शिक्षकांचे सेवेत समावेशन करण्यात यावे, लिपिकांना वरिष्ठ लिपिक पदांवर पदोन्नती देऊन तत्काळ नियुक्ती करावी, वाहनचालकांच्या वेतन त्रुटी दूर कराव्यात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना अंतर्गत पात्र सफाई कर्मचाऱ्यांना गृहसंकुल उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, कळवा रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे थकीत वेतन व बोनसदेयके अदा करावीत. तसेच समान काम समान वेतनातील वेतन फरक संबंधित कामगारांना तत्काळ देण्यात यावा, आदी मागण्या प्रशासनाकडे करण्यात आल्या. बैठकीस नगरसेवक विकास पाटील, सुरेश कांबळे, नगरसेविका उषा वाघ, कामगार प्रतिनिधी विशाल वाघ, रविंद्र रेड्डी, राजाभाऊ सोनगडा, दयाशंकर यादव, दत्ता घुगे, अजित मोरे आदी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना श्री.केळकर यांनी सांगितले की ठाणे महापालिकेच्या विविध विभागांत सुमारे ४५०० कंत्राटी कर्मचारी काम करत असून त्यांचा कायदेशीर हक्क असलेल्या ग्रॅच्युईटीबाबत कंत्राटदाराकडून माहीत मिळत नसून प्रशासनालाही याबाबत काही माहिती नसल्याचे उघड झाले आहे. प्रत्येक कामगाराचे महिना ८४० रुपये ग्रॅच्युईटी रक्कम देण्याची तरतूद आहे, त्यामुळे कोट्यवधींचा घोटाळा झाला असण्याची दाट शक्यता श्री.केळकर यांनी व्यक्त केली. याबाबत सात दिवसांत माहिती देण्याचे तसेच वेळप्रसंगी कंत्राटदारांचे बिल रोखण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे श्री.केळकर म्हणाले.
२२७५ पात्र कामगारांना आश्वासित प्रगती योजना
आमदार संजय केळकर यांनी फेब्रुवारी महिन्यात घेतलेल्या बैठकीनंतर प्रशासनाने २२७५ पात्र कामगारांना आश्वासित प्रगती योजना तत्काळ प्रभावाने लागू केली आहे. यात १० वर्षे सेवा झालेले ७११ तर २० वर्षे सेवा झालेल्या १५६४ कामगारांचा समावेश आहे.