शहापूर-मुरबाड-खोपोली महामार्ग आठ वर्षांनंतरही अपूर्ण
शहापूर: शहापूर-मुरबाड-खोपोली महामार्गाच्या कामाला सन २०१८ मध्ये सुरुवात झाली. मात्र तब्बल आठ वर्षे उलटूनही शहापूर तालुक्यातील खुटघर, नडगाव तसेच मुरबाड तालुक्यातील वज्राचीवाडी या परिसरातील रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याने वाहनचालक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहचालकांनी धोकादायक मार्गावरून प्रवास करण्याऐवजी चक्क चार किमी लांबचा पर्यायी मार्ग स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.
खुटघर परिसरातील रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा पडल्याने वाहनचालकांसमोर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या खड्ड्यातून वाहने मार्गस्थ होताना वाहनांचा ताबा सुटून पलटी होण्याची शक्यता आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक ठरत असल्याने नडगाव, शिरगाव, शेंद्रूण, लेनाड, नेहरोली, जांभे, दहिवली, कळगाव, टेंभरे, आल्याणी आदी भागातील नागरीकांनी मुख्य मार्गाचा वापर टाळण्यास सुरुवात केली आहे. खुटघर येथील धोकादायक रस्ता टाळण्यासाठी नागरिक समृद्धी महामार्गाच्या पर्यायी रस्त्याने शहापूर-किन्हवली महामार्गाकडील पर्यायी रस्त्याचा वापर करीत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना सुमारे चार किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत आहे. परिणामी प्रवासाचा वेळ, इंधन आणि वाहनांचा खर्च वाढत असून, अपूर्ण महामार्गाचा फटका थेट नागरिकांना बसत आहे.
दरम्यान, या रस्त्याच्या कामाचे ठेकेदार एस. के. इन्फ्रा असून, पोटठेकेदार म्हणून जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीकडून काम करण्यात आले असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. परिणामी त्यामुळे रस्त्याच्या अपूर्ण कामाची जबाबदारी नेमकी कोणाची, कामाला विलंब का झाला आणि रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेची तपासणी कशी करण्यात आली असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. महामार्गाच्या कामाला २०१८ मध्ये सुरुवात झाल्यानंतर आठ वर्षांचा कालावधी लोटला. मात्र, अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण असून, काही भागात खड्डे, असमतोल रस्ता आणि अर्धवट कामामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि कामाच्या निकृष्ट गुणवत्तेमुळेच नागरिकांना या परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप होत आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही रस्ता सुरक्षित आणि वाहतुकीस योग्य होत नसेल तर या कामाचे नियोजन आणि देखरेख याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. तथापि या अपूर्ण रस्त्याबाबत नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांनी संबंधित प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने दिली आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात आंदोलनेही करण्यात आली. मात्र वारंवार मागणी करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही.त्यामुळे जनतेमध्ये संतप्त भावना निर्माण झाली आहे.
आठ वर्षांपासून रस्ता अपूर्ण का, कामाला विलंब होण्यामागे नेमकी कारणे कोणती, संबंधित ठेकेदार आणि पोटठेकेदाराच्या कामाची गुणवत्ता तपासली आहे का, दोष आढळल्यास कारवाई का होत नाही, असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. शहापूर-मुरबाड- खोपोली महामार्ग हा या परिसराच्या विकासासाठी महत्वाचा मार्ग आहे. मात्र अपूर्ण कामे आणि धोकादायक खड्ड्यांमुळे या महामार्गाचा अपेक्षित लाभ नागरिकांना मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. नागरिकांनी आपला नेहमीचा मार्ग सोडून चार किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारणे, ही प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे. रस्ता नागरिकांच्या सोयीसाठी असतो. मात्र येथे रस्त्यामुळेच नागरिकांना पर्यायी मार्ग शोधावा लागत असल्याने परिस्थिती किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते.