ठाणे: राज्यभर राबविण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत एक लाखाहून अधिक अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी व्यवहारिक मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. उर्वरित चालकांनीही १५ ऑगस्टपूर्वी प्रशिक्षण पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले.
१ मे पासून सुरू झालेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाचा’ समारोप १७ ऑगस्ट रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार असून, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच मराठी भाषामंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. व्यवहारिक मराठी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या हजारो अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांना यावेळी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस मुंबई मराठी साहित्य संघ, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषदचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, “महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, तर मराठीचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल, तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे, तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी दोन प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो.”
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या चालकांना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रांबाबत बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून दिले जाणारे प्रमाणपत्र हे अभियानात सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र आहे. मात्र केवळ प्रमाणपत्र दाखविल्यामुळे कारवाई टळणार नाही. आरटीओ अधिकारी चालकांशी मराठीत संवाद साधतील. त्या संवादामध्ये चालकाला मराठीत उत्तर देता आले, तरच त्याने नियमांचे पालन केल्याचे मानले जाईल.
यावेळी त्यांनी मराठी प्रवाशांनाही आवाहन केले. समोरचा चालक हिंदी भाषिक आहे असे गृहीत धरून मराठी प्रवाशांनी हिंदीत संवाद साधू नये. मराठी भाषिकांनी मराठीतच संवाद साधल्यास मराठीचा वापर अधिक वाढेल. मराठीचा सन्मान राखण्याची जबाबदारी केवळ चालकांचीच नाही, तर प्रत्येक मराठी नागरिकाची आहे, असे ते म्हणाले.