छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील बाह्यरुग्ण सेवा ठप्प

ठाण्यात निवासी डाॅक्टरांचा संप

ठाणे : बुधवारी संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य निवासी डाॅक्टर संघटनेने (मार्ड) बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचा परिणाम ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील व्यवस्थापनावर झाला. रुग्णालातील सुमारे १५० निवासी डाॅक्टरांनी संपात सहभाग घेत कामकाज बंद केले. यामुळे बाह्यरुग्ण सेवा ठप्प झाली होती.

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील विविध भागातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. मार्डच्या संपामुळे येथील बाह्यरुग्ण (ओपीडी) आणि कक्षातील रुग्णांना फटका बसला. याबाबत निवासी डाॅक्टरांनी सांगितले की, बीएचएमएस आणि एमबीबीएस या दोन्ही अभ्यासक्रमांचा स्वरूप व प्रशिक्षण पूर्णपणे वेगळे आहे. अशा परिस्थितीत बीएचएमएस पदवीधारकांना ॲलोपॅथी उपचार करण्याची परवानगी देणे रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असून, अंतिम निर्णय येईपर्यंत सीसीएमपीची अंमलबजावणी व नोंदणी प्रक्रिया स्थगित ठेवण्याची मागणी डॉक्टरांनी केली आहे.

आंदोलनाच्या पहिल्या २४ तासांत आपत्कालीन व अपघात विभागातील सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, नियमित कामकाज, नियोजित शस्त्रक्रिया आणि शैक्षणिक उपक्रम बंद ठेवण्यात आले आहेत. शासनाकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढील टप्प्यात आपत्कालीन सेवाही बंद करण्याचा इशारा मार्डने दिला आहे.

बीएचएमएस आणि एमबीबीएस या दोन्ही अभ्यासक्रमांचा स्वरूप व प्रशिक्षण पूर्णपणे वेगळे आहे. परंतु राज्य शासनाच्या निर्णयामुळे आम्ही संपावर जाण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील १५० निवासी डाॅक्टरांनी संपात सहभाग घेतला होता. प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर, आपत्कालीन विभागातील सेवा देखील बंद होतील, असा इशारा डाॅ. विजय कुरे, आरजीएमसी, अध्यक्ष मार्ड, ठाणे यांनी दिला.