दिवा पोलीस स्टेशन सज्ज; नागरिकांची मुंब्रावारी कायम

ठाणे: दिवा शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्याचबरोबर वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना लक्षात घेता दिवा येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. विशेष म्हणजे पोलीस स्टेशनसाठीची इमारत तयार असून, ठाणे महापालिकेकडून नुकतेच या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र मिळाले असल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप पोलीस स्टेशन प्रत्यक्षात सुरू झालेले नसल्याने दिवेकरांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

सध्या दिव्यातील नागरिकांना तक्रार किंवा गुन्ह्याची नोंद करण्यासाठी मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये जावे लागते. दिवा ते मुंब्रा हा प्रवास विशेषतः रात्रीच्या वेळी नागरिकांसाठी मोठी अडचण ठरत आहे. एखादी घटना रात्री उशिरा घडल्यास परिस्थिती आणखी गंभीर होते. रात्री १२ ते १ नंतर लोकल सेवा बंद होत असल्याने नागरिकांना तक्रार करण्यासाठी किंवा पोलिसांची मदत घेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे स्वतंत्र दिवा पोलीस स्टेशन तातडीने सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.

दिवा परिसरात घरफोडी, चोरीसह विविध गुन्ह्यांच्या घटना समोर येत आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध पोलीस बळ अपुरे असल्याने पोलिसांवर मोठा ताण येत असल्याचे चित्र आहे. पोलीस बळाची कमतरता असल्यास गुन्ह्यांचा तपास, घटनास्थळी पोहोचणे आणि पुढील कारवाई यामध्ये विलंब होण्याची शक्यता निर्माण होत असून दिवा परिसरासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरू झाल्यास नागरिकांना तक्रार नोंदवणे सोपे होईलच, शिवाय स्थानिक पातळीवर पोलीस यंत्रणा अधिक सक्षम होऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल.

पोलीस स्टेशनची इमारत तयार असून ओसी देखील मिळाली असून प्रत्यक्ष पोलीस स्टेशन सुरू करण्यास विलंब का होत आहे? असा सवाल आता दिवेकरांकडून उपस्थित केला जात आहे. दिव्याची वाढती लोकसंख्या, वाढते गुन्हे, अपुरे पोलीस बळ आणि रात्रीच्या वेळी नागरिकांना होणारी गैरसोय लक्षात घेता प्रशासनाने तात्काळ दिवा पोलीस स्टेशन सुरू करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.