सुरक्षित पाणी साठवणुकीसाठी ठाण्याच्या तंत्रज्ञानाला जागतिक मान्यता

ठाणे : सुरक्षित पाणी साठवणुकीच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या ठाण्यातील ‘सिक्युअर स्टोअर’ या भारतीय ब्रँडला आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक मान्यता मिळाली आहे.

या तंत्रज्ञानाचा स्वीकार करत, मेक्सिको येथील उच्चस्तरीय व्यावसायिक प्रतिनिधी मंडळ मुंबईत आले असून या ऐतिहासिक भागीदारी करारावर स्वाक्षरी करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यानी या नवीन उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी करण्यात आली. कराराआधी मुंबईतील प्रसिध्द श्रीसिध्दीविनायक मंदिरात सिध्दीविनायकाचे दर्शन घेऊन सदर करारावर सह्या करण्यात आल्या. सिध्दीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी शिष्टमंडळाचे मंदिर व्यवस्थापनातर्फे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचे जनक ठाण्याचे सुपुत्र उद्योजक सुनील उपलप हे असून, त्यांची ही कामगिरी ठाणे आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत भूषणावह आहे. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये कार्लोस गोंझालेझ, श्रीमती आल्डा अलेजांद्रा व्हिलानुएव्हा (उप-महावाणिज्यदूत, मेक्सिको, मुंबई) व सुनील उपलप, संस्थापक ‘सिक्युअर स्टोअर’ उपस्थित होते.

भारतीय तंत्रज्ञानाला मिळालेली ही आंतरराष्ट्रीय पावती म्हणजे भारताच्या नाविन्यपूर्ण संशोधन आणि कौशल्याची जागतिक पटलावर घेतलेली दखल आहे, असे सुनील उपलप यावेळी म्हणाले. भारत आणि मेक्सिको यांच्यातील व्यापार वृध्दीचा हा चांगला करार असून यामुळे दोन्ही देशात आधुनिक तंत्रज्ञान वाढीस व हस्तांतरणास मदत होणार आहे, असे कार्लोस गोंझालेझ, यानी सांगितले.