शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू

१० विद्यार्थी जखमी

मुंबई : चेंबूर येथे शाळेच्या बसवर भले मोठे झाड कोसळून बसमध्ये असलेली 10 मुले जखमी झाली. दरम्यान एक मुलगा उपचारादरम्यान मृत्यू पावल्याचे कळते. चेंबूर येथील डायमंड उद्यान परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे.

झाड कोसळल्यामुळे बसचे प्रचंड नुकसान झाले असून, बसचा मागचा भाग काही प्रमाणात दबल्याचेही दिसत आहे. या घटनेनंतर चेंबूरमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत लगेचच मदतकार्य सुरू करण्यात आले. बसवर भले मोठे झाड कोसळल्यानंतर बसमध्ये मुले अडकून पडली होती. काही प्रयत्नांनंतर मुलांना बाहेर काढण्यात यश आले असले तरी त्यांना गंभीर जखमा झाल्याचे सांगितले जात आहे. बसमध्ये एकूण 13 विद्यार्थी असून ही बस कोणत्या शाळेची होती याबाबतची माहिती समोर आलेली नाही.

जखमी मुलांपैकी एका मुलावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे कळते. शाळा संपून ही मुले आपापल्या घरी जायचे म्हणून शाळेच्या बसने निघाली असताना हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

ठाण्याला इशारा

चेंबूरमधील दुर्घटना ही ठाण्यासाठीही गंभीर इशारा आहे. ठाणे शहरात अनेक जुनी आणि विशाल झाडे शाळा, रस्ते व वर्दळीच्या ठिकाणी आहेत. पावसाळ्यापूर्वी अशा झाडांची तज्ज्ञांकडून नियमित तपासणी करून धोकादायक फांद्या आणि कमकुवत झालेल्या झाडांवर तातडीने शास्त्रीय उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. झाडे तोडणे हा उपाय नाही; झाडे जपत नागरिकांचे जीव सुरक्षित ठेवणे हीच खरी पर्यावरणपूरक भूमिका आहे. दुर्घटना घडल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा ती टाळण्यासाठी आधीच नियोजन करणे अधिक गरजेचे आहे, असे मत पर्यावरण अभ्यासक प्रशांत सिनकर यांनी व्यक्त केले.