ठाणे : राबोडी येथिल हॉली क्रॉस शाळेत इयत्ता सहावीमध्ये प्रवेश देण्यासाठी फीसह एक लाखाची लाच घेणाऱ्या एका महिलेसह खाजगी इसमाला ठाण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे.
फातिमा अन्सारी रा. राबोडी आणि चैतन्य प्रधान रा. ठाणे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. एका महिलेने ठाण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे १७ जून रोजी तक्रार दिली होती. त्याची पडताळणी १८ जून रोजी करण्यात आली होती. आरोपीनी एक लाख २० हजार इतकी मागणी केली होती. तडजोडीनंतर एक लाख रुपये देण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यानुसार काल २९ जून रोजी हॉली क्रॉस शाळेत सहावीच्या इयत्तेमध्ये लागणारी फी रुपये २२,७०० वगळून ७७,३०० रुपयांची लाच घेणाऱ्या आरोपी फातिमा आणि खाजगी इसम चैतन्य प्रधान यांना काल दुपारी ३च्या दरम्यान पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्याची नोंद राबोडी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे.