ठामपात १६३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या घाऊक बदल्या

ठाणे : ठाणे महापालिकेतील कार्यालयीन अधीक्षकापासून सफाई कामगारांपर्यंततब्बल १६३ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या घाऊक बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांचे साम्राज्य पसरले असून अतिक्रमण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने फेरीवाल्यांनी रस्ते व्यापल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला होता. त्याची गंभीर दखल घेऊन महापालिका प्रशासनाने आज या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये लिपिक, बिगारी, शिपाई, वरिष्ठ लिपिक यांचा समावेश असून महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार ह्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बदल्या रद्द करण्यासाठी अधिकारी-कर्मचारी धावाधाव करू शकणार नाहीत. अतिक्रमण विभागातील फेरीवाल्यांना कारवाई होणार असल्याची माहिती कर्मचारी देत होते, त्यामुळे ही लॉबी तोडण्यासाठी महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त श्री. राव यांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या असून वरिष्ठ अधिकारी, सहाय्यक आयुक्त उपायुक्त, कार्यकारी अभियंता नगरविकास आदी विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्या बदल्या करण्याचा मुहूर्त प्रशासनाला कधी मिळणार असा सवाल महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

महापालिका आयुक्तांनी एकाच विभागात अनेक वर्षे एकाच ठिकाणी तंबू ठोकून बसलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या बदल्या कधी करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.