राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, वसंत डावखरे फाउंडेशन आणि नायट्रो फिटनेस यांचा संयुक्त उपक्रम
५०० हून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
ठाणे : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते प्रबोध वसंतराव डावखरे यांच्या पुढाकारातून ठाण्यात भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात ५०० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेत योग, आरोग्य आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, वसंत डावखरे फाउंडेशन आणि नायट्रो फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला. सकाळी ७ ते १० या वेळेत पार पडलेल्या शिबिरात युवक, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह विविध वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
योगाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, आरोग्याविषयी जनजागृती करणे आणि ‘फिट इंडिया, हेल्दी इंडिया’ या संकल्पनेला बळकटी देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी फिटनेस आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश केलेले प्रबोध वसंतराव डावखरे यांनी पक्षप्रवेशानंतर आयोजित केलेला हा पहिलाच सार्वजनिक सामाजिक उपक्रम ठरला. नागरिकांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक करण्यात आले.
यावेळी ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिन्द बल्लाळ, व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ, युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष वीरू वाघमारे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रबोध डावखरे म्हणाले, “राज्यसभेचे खासदार पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रेरणा, मार्गदर्शन आणि शुभेच्छांमुळे या उपक्रमाला विशेष बळ मिळाले. निरोगी भारत आणि सक्षम युवा पिढी घडवण्यासाठी नियमित योग, व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैली आवश्यक आहे. युवकांनी फिटनेसला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवून राष्ट्रनिर्मितीत सक्रिय योगदान द्यावे.”
योग, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडविणारा हा उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि जनहिताचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.