बदलापूरमध्ये भीषण कार अपघात; फुटबॉलपटूसह दोघांचा मृत्यू

वाढदिवशीच काळाचा घाला; एक जण गंभीर जखमी

बदलापूर : मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्गावरील एरंजाड परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण कार अपघातात फुटबॉलपटूसह दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.

मृतांमध्ये फुटबॉलपटू योगेश नेगी (२६) आणि त्याची मैत्रीण रिबेका जेकब (२४) यांचा समावेश आहे. योगेशच्या वाढदिवशीच ही दुर्घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

योगेश नेगी याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिघे मित्र-मैत्रीण एकत्र आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर मध्यरात्रीनंतर ते बदलापूरच्या दिशेने बीएमडब्ल्यू कारमधून निघाले. पहाटे एरंजाड परिसरात कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन दुभाजकावर जोरात आदळले. त्यानंतर कारने अनेक पलट्या घेतल्या.

अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. इंजिन, चाके आणि इतर सुटे भाग महामार्गावर दूरवर विखुरले. या अपघातात योगेश नेगी आणि रिबेका जेकब यांचा जागीच मृत्यू झाला, तर कारचा मालक अंगद गिल (२५) गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर कल्याण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

दरम्यान, अपघातानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामध्ये कारचा वेग ताशी २५१ किलोमीटर असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ अपघातापूर्वीचा असल्याचे सांगितले जात असल्याने अतिवेग हे अपघातामागील प्रमुख कारण असावे, अशी चर्चा सुरू आहे.

मात्र, या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वाहनाचा वेग, रस्त्याची स्थिती, तांत्रिक बाबी तसेच व्हायरल व्हिडिओची सत्यता या सर्व बाबींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.