या भूकंपात अस्मिता गाडली जाऊ नये !

भूकंप होण्यापूर्वी पृथ्वीच्या आत असलेल्या ‘टेक्टोनिक प्लेट्स’ एकमेकांवर आदळत असतात. या प्लेट्समध्ये एक द्रव पदार्थ असतो आणि त्याचे संतुलन बिघडले की भूगर्भात होणारे घर्षण भूकंपास कारणीभूत ठरतात. भूगर्भातील या हालचालींचा अंदाज घेण्याचे तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे प्रत्यक्ष भूकंपामुळे होणारी हानी काही प्रमाणात थांबवण्यात येऊ शकते. अर्थात भूगर्भातील या हालचालींचे गूढ संपूर्णपणे उकलले नसल्याने भूकंप होत राहतात आणि हानी होत राहते.

ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा एकदा भूकंपाचा हादरा बसला आहे. पक्षांतर्गत (भूगर्भ) संघर्ष सुरू असल्याचे संकेत पक्षश्रेष्ठींना मिळाले नव्हते असे म्हणता येणार नाही, परंतु या हालचाली अत्यंत गूढ आणि इतक्या खोल होत होत्या की नेतृत्वाला त्यावर नियंत्रण मिळवता आले नाही. ठाकरे यांच्या सेनेवर बाळासाहेबांच्या प्रेमापोटी सहानुभूती बाळगणारे मात्र या हालचाली समजल्याच नाहीत हे मानायला तयार नसणार. पक्षफुटीचे शिल्पकार एकनाथ शिंदे असले तरी पक्षाचे प्रमुख नेते ही हानी थांबवण्यात कमी पडले असाच तर्क काढणार. ‘दोन महिन्यांपासून आम्ही खासदारांच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष ठेऊन होतो’, असे श्रीमती सुषमा अंधारे म्हणाल्या. या काळात फुटीर खासदारांशी संवाद झाला होता का आणि त्यांना पक्ष सोडण्याच्या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी कोणती पावले उचलली गेली होती, हा सवाल ठाकरे सेनेवर प्रेम करणारे विचारत राहणार. तो त्यांचा अधिकार आहे आणि त्यांना उत्तर देणे ठाकरे सेनेच्या नेत्यांचे उत्तरदायित्व!

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त होत असते. मागील उभ्या फुटीपेक्षा मात्र या खेपेस त्याची मात्रा कमी आहे. याचा दुसरा अर्थ असाही होतो की श्री.शिंदे यांच्याबद्दल पूर्वी जो राग होता तो या खेपेस कमी दिसत आहे. श्री. शिंदे यांच्या पक्षाला निवडणुकीत मिळणारे यश हे त्यांच्या व्यूहरचनेला मिळणारे समर्थन आहे. या घडामोडींमुळे सेनेची ताकद (संख्यात्मक) निश्चितच वाढली आहे. परंतु सत्तेत सहभागी झाल्याने त्यांची ‘बार्गेनिंग पॉवर’ मात्र हळूहळू कमी होत जाऊ शकते. महाराष्ट्रात एकच शिवसेना राहिली आणि ती भाजपच्या दावणीला बांधली गेली तर तिची ताकद यथावकाश कमी होऊ शकते. महाराष्ट्राची अस्मिता बोथट होणार नाही, याची जबाबदारी आता श्री.शिंदे यांच्यावर आली आहे. महाराष्ट्राची भूमी पक्षांतरासाठी अनुकूल आहे असा संदेश सत्ताधिशांना गेला तर त्याची किंमत कमी होऊ शकते. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि प्रतिष्ठा अशा राजकारणात कमी होऊ नये म्हणजे मिळवले. हा राजकीय भूकंप थांबवता आला नसला तरी अस्मिता त्याखाली गाडली जाणार नाही याची काळजी घ्यावी लागणार. जे हे काम करतील तेच खरे सेना म्हणून जनतेच्या मनात राहतील. श्री.शिंदे यांना भूकंपानंतर पक्षाचे, मराठी माणसाचे आणि राज्याच्या हिताची फेरमांडणी करावी लागणार आहे.