अतिधोकादायक ४२ इमारतींची वीज-नळ जोडणी तोडणार

ठाणे : ठाणे महानगरपालिकेने जाहीर केलेल्या ४२ अतिधोकादायक इमारतींची वीज आणि नळजोडणी तोडण्याची कारवाई केली जाणार आहे. येथील रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे या करिता हे कडक पाऊल महापालिकेने उचलले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

ठाणे महापालिकेने शहरातील ९१ इमारती अतिधोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. यापैकी ४२ इमारतींमध्ये अद्याप रहिवासी वास्तव्य करत असल्याने भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने आता या इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने २०२६-२७ या वर्षासाठी केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरातील अनेक जुन्या आणि जीर्ण झालेल्या इमारती राहण्यास असुरक्षित ठरल्या आहेत. काही ठिकाणी रहिवाशांचे स्थलांतर करण्यात यश आले असले तरी अनेकांनी घरे रिकामी करण्यास नकार दिल्याने कारवाईला उशीर होत आहे. अतिधोकादायक इमारतींच्या संख्येत नौपाडा-कोपरी प्रभाग आघाडीवर असून येथे तब्बल ५२ इमारती अतिधोकादायक आहेत. या भागातील २४ इमारतींमध्ये अजूनही नागरिक राहत असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय लोकमान्यनगर-सावरकरनगरमध्ये १६, वर्तकनगरमध्ये १४, माजीवडा-मानपाडामध्ये ११, उथळसरमध्ये ११, कळवा येथे आठ तर मुंब्रा आणि दिवा येथे प्रत्येकी तीन अतिधोकादायक इमारतींची नोंद झाली आहे. दरम्यान, पालिकेने आतापर्यंत ५१ इमारतींची तपासणी पूर्ण केली असून केवळ दोन इमारतींवर निष्कासन अथवा पाडकामाची कारवाई करण्यात आली आहे. काही इमारती रहिवाशांनी स्वेच्छेने रिकाम्या केल्या असल्या तरी अनेक ठिकाणी पुनर्वसन आणि स्थलांतराच्या प्रश्नांमुळे प्रशासनास अडचणींचा सामना करावा लागत आहे.

संबंधित ४२ इमारतींचा वीजपुरवठा बंद करण्यासाठी महावितरण आणि टोरेंट पॉवर कंपनीला पत्र पाठविण्यात आले आहे. तसेच पाणीपुरवठा विभागालाही नळजोडण्या तोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रभाग समिती स्तरावर इमारतधारकांना नोटिसा बजावण्याची मोहीम सुरू असून रहिवाशांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.