ठाणे जिल्ह्यातील यंत्रणांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
ठाणे : पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यामध्ये दरवर्षी धोकादायक इमारती, रस्त्यातील खड्डे, दरडी कोसळणे, पाणी तुंबणे यामुळे जीवितहानी होत असते. आशा घटना टाळून ‘शून्य जीवितहानी’चे लक्ष्य गाठण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
ठाणे जिल्ह्यातील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी मुंबई येथे विशेष बैठक पार पडली. या बैठकीत खासदार सुरेश म्हात्रे, आमदार किसन कथोरे, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपजिल्हाधिकारी संदीप माने, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव नवीन सोना, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव तसेच जिल्ह्यातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त, महापौर, पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आणि एमएमआरडीए यांनी समन्वय साधून कामांना गती द्यावी, असे निर्देश शिंदे यांनी दिले. रस्त्यांवरील खड्डे तत्काळ बुजविणे, सुरू असलेली कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे तसेच जिल्ह्यातील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यावर भर देण्यात आला.
मुरबाड आणि मुंब्रा येथे गतवर्षी घडलेल्या दरड दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर घाट परिसरातील सुरक्षा उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला. या दोन्ही ठिकाणी सुरू असलेल्या संरक्षक कामांपैकी सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. बैठकीत धोकादायक इमारतींचा प्रश्नही चर्चेत आला. दरवर्षी त्याच इमारतींना धोकादायक घोषित करण्याऐवजी त्यांचा पुनर्विकास आणि दुरुस्ती करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि मुंब्रा परिसरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ठाणे महापालिकेच्या धर्तीवर संबंधित महापालिकांनी स्वतंत्र क्लस्टर सेल स्थापन करून पुनर्विकास प्रकल्पांना गती द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे महापालिकेच्या टीडीआरएफच्या धर्तीवर इतर महानगरपालिकांनीही स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन पथके स्थापन करावीत आणि नागरिकांच्या मदतीसाठी २४ तास नियंत्रण कक्ष सुरू ठेवावेत, असे आवाहन शिंदे यांनी केले. तसेच होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट, धोकादायक झाडांची छाटणी, सखल भागांतील पंपांची कार्यक्षमता तपासणे आणि रेल्वे सेवा खंडित झाल्यास पर्यायी आपत्कालीन आराखडा तयार ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. साथीचे रोग रोखण्यासाठी शहरी आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. सर्पदंशावरील औषधांची उपलब्धता सुनिश्चित करावी. नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना गरज पडल्यास सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी बोटी, लाईफ जॅकेट आणि बचाव साहित्य सज्ज ठेवावे, असेही त्यांनी सांगितले. छोट्या महानगरपालिकांना तातडीची कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.