नियमात होणार महासभा; दिसणार नाही ‘सवतासुभा’!

ठामपाची उद्याची महासभा सुरळीत होण्यासाठी सर्वपक्षीय हालचाली

ठाणे : ठाणे महापालिकेच्या मागील तीन महासभांमध्ये झालेला गोंधळ येत्या महासभेत होणार नाही, अशी शक्यता दिसत आहे. यापुढे होणाऱ्या महासभा नियमानुसार होतील या दृष्टीने सर्वपक्षीय नेत्यांनी हालचाली सुरु केल्या असल्याचे कळते. त्यामुळे किमान दोन दिवस तरी या सर्वसाधारण सभेचे कामकाज चालणार असल्याचे एका अधिकाऱ्याने ‘ठाणेवैभव’ला सांगितले.

राज्यासह ठाणे महापालिकेत शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांची महायुती असली तरी ठाणे महापालिकेत या दोन पक्षात मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. आरोप-प्रत्यारोपांमुळे महासभेचे कामकाज वारंवार विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर गुरुवारी होणारी महासभा सुरळीत आणि नियमानुसार पार पडावी यासाठी शिंदे गटाने हालचाली सुरू केल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार महासभेपूर्वी बुधवारी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेऊन कामकाजाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती महापालिकेतील एका पदाधिकाऱ्याने दिली.

ठाणे महापालिकेत स्पष्ट बहुमतासह सत्तेत आलेल्या शिंदे गटाला मागील चार महिन्यांत झालेल्या महासभांमध्ये विरोधकांसह मित्रपक्ष भाजपकडूनही टीकेचा सामना करावा लागला होता. महासभांमधील गदारोळामुळे अनेक प्रस्ताव चर्चेविनाच सत्ताधारी शिवसेनेने मंजूर केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. स्थायी समिती, विषय समित्या, प्रभाग समित्या आणि परिवहन समित्यांची स्थापना अद्याप न झाल्याने भाजपसह इतर पक्षांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले. या नाराजीचे पडसादही महासभांमध्ये उमटले होते. यावेळी मात्र परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नगरसेवकांना संयम बाळगून सभागृहाचे कामकाज चालविण्याचे निर्देश दिल्याचे समजते. त्यानुसार पक्षातील वरिष्ठ नगरसेवकांनी पुढाकार घेत महासभा नियमानुसार चालविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. अशातच महासभेपूर्वी बुधवारी दुपारी महापालिकेत सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत प्रथम लक्षवेधी सूचना, त्यानंतर प्रश्नोत्तरे आणि शेवटी विषयपत्रिकेवरील चर्चा या क्रमाने कामकाज चालविण्यावर सहमती होण्याची शक्यता आहे. कोणत्याही विषयावर घाईगडबड न करता सर्व सदस्यांना मते मांडण्याची संधी देण्यात यावी, यावरही भर दिला जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आवश्यक असल्यास महासभेचे कामकाज दोन ते तीन दिवस चालविण्याचाही पर्याय खुला ठेवला जाणार आहे.

सभागृहात पुन्हा गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून नगरसेवकांना सूचनाही दिल्या जाणार आहेत. महायुतीचा भाग म्हणून परस्परांवर सार्वजनिक आरोप-प्रत्यारोप टाळून कामकाजाला प्राधान्य देण्याचा संदेश दिला जाणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनाही समन्वय प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न होणार असल्याचे बोलले जात आहे.