अकाली जन्मलेल्या बालकांची दृष्टी वाचवण्यात ठाणे सिव्हिल अव्वल!

* वर्षभरात १००० तपासण्या
* १० बालकांवर यशस्वी उपचार
* राज्यात ठाणे प्रथम

ठाणे: अकाली जन्मलेल्या व कमी वजनाच्या बालकांमध्ये अंधत्वाचा धोका निर्माण करणाऱ्या रॅटीनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी (आरओपी) या गंभीर आजाराची तपासणी व उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयातील बाल नेत्र विभागात . गेल्या वर्षभरात तब्बल १००० बालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १० बालकांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. राज्यात ठाणे जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.

आरओपी हा आजार प्रामुख्याने अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये आढळतो. वेळेत निदान व उपचार न झाल्यास कायमस्वरूपी दृष्टीदोष किंवा अंधत्व येऊ शकते. या पार्श्वभूमीवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाल नेत्र चिकित्सा विभाग कार्यरत असून, या ठिकाणी बालकांची नियमित डोळ्यांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती नेत्र शल्य चिकित्सक डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी दिली.

राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एनआयसीयु/एसएनसीयुमध्ये उपचार घेणाऱ्या बालकांची विशेष तपासणी केली जाते. आधुनिक रेटिनल कॅमेऱ्याच्या माध्यमातून बाळांच्या डोळ्यांची तपासणी करून आवश्यकतेनुसार तातडीने उपचार केले जात आहेत. या उपक्रमामुळे अनेक बालकांची दृष्टी वाचण्यास मदत झाली असून, पालकांमध्येही जागरूकता वाढली आहे. यासाठी नेत्रशल्य चिकित्सक डॉ. शुभांगी अंबाडेकर, डॉ. राहुल गुरव, परिसेविका अस्मिता कदम, शीतल जठार, नीलम निकाळजे, किर्ती बोराडे आदी अथक परिश्रम घेत आहेत.

अकाली जन्मलेल्या बालकांमध्ये ‘आरओपी’मुळे दृष्टी गमावण्याचा धोका असतो. मात्र योग्यवेळी स्क्रीनिंग आणि उपचार केल्यास हा धोका टाळता येतो. ठाणे सिव्हिल रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर होत असलेली तपासणी ही बालकांच्या दृष्टी संरक्षणासाठी महत्त्वाची ठरत आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.