गावदेवी मंडई इमारतीतील सरकारी कार्यालयांचे स्थलांतर

ठाणे: गावदेवी भाजी मंडईच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीनंतर या इमारतीच्या दुरुस्तीचे आणि साफसफाईचे काम हाती घेण्यात आले असून येथील सहकार विभागाची दोन महत्त्वाची कार्यालये तात्पुरत्या स्वरूपात नव्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली आहेत.

मंडईच्या इमारतीत असलेल्या पार्किंगमध्ये रोज ४५० दुचाकी वाहने उभी केली जात होती. तर याच इमारतीत जिल्हाधिकारी पुरस्कृत कौशल्य विकास केंद्राचे कार्यालय तसेच पालिकेच्या नौपाडा प्रभाग समितीचे कार्यालय सुरू होते. याशिवाय, सहकार विभागाची दोन महत्वाची कार्यालये होती. ही कार्यालये आग दुर्घटनेनंतर आता तात्पुरत्या स्वरूपात अन्य ठिकाणी हलविण्यात आली आहेत. यामध्ये ठाणे शहर सहकारी संस्था, उपनिबंधक कार्यालय आणि ठाणे सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक कार्यालय यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाअंतर्गत कार्यरत असलेले ठाणे शहर सहकारी संस्था, उपनिबंधक कार्यालय पूर्वी गांवदेवी भाजी मंडईत पहिल्या मजल्यावर सुरू होते. मात्र आग दुर्घटनेनंतर हे कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या इमारतीत तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात आले आहे.

तसेच ठाणे जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयही मंडई इमारतीतून हलविण्यात आले आहे. हे कार्यालय आता कांचनगंगा बिल्डिंग, तिसरा मजला, गुरुकृपा बुक डेपो जवळ, शिवाजी पथ, ठाणे पश्चिम येथे सुरू करण्यात आले आहे.