* ममता ‘दीदी डेंजर झोन’मध्ये
* एक्झिट पोलचे अंदाज
मुंबई : देशाचे लक्ष लागलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया संपूर्णपणे पार पडली. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 90 टक्के मतदान झाले असून पहिल्या टप्प्यात मतदानाची एकूण आकडेवारी 92 टक्क्यांहून अधिक होती. त्यामुळे, पश्चिम बंगालमध्ये यंदा बदलाचे वारे वाहत असल्याचे राजकीय तज्ञाचे मत आहे.
मतदानाची वाढीव टक्केवारी ही विरोधातील पक्षाला आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपला पूरक असल्याची चर्चा होत असतानाच आता एक्झिट पोलचे आकडेही समोर आले आहेत. मॅट्रीझच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बनर्जींच्या 15 वर्षांपासूनच्या सत्तेला सुरूंग लागू शकतो. मॅट्रीझच्या एक्झिट पोलनुसार, भाजप बहुमताचा आकडा पार करू शकते. प. बंगालमधील 294 जागांपैकी भाजपला 146 ते 161 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. तर, ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला 125 ते 140 जागांवरच थांबावे लागणार असल्याचे दिसून येते. तर, काँग्रेससह डाव्या विचारसरणीच्या पक्षांना मिळून अवघ्या 6 ते 7 जागांवर समाधान मानावे लागेल, असा अंदाज आहे. बंगालमध्ये यंदा भाजपला 42 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे, तर टीएमसीच्या पारड्यात 40 टक्के मतं पडतील. त्यामुळे, एक्झिट पोलनुसार दोन्ही पक्षांमध्ये तगडी टक्कर असून भाजपची आघाडी होत असल्याचा अंदाज आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत 23 एप्रिल रोजी 152 जागांच्या पहिल्या टप्प्यात विक्रमी 93 टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यानंतर, आज 142 जागांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 89.99 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे, राज्यात दोन्ही टप्प्यातील एकूण सरासराी 92 टक्क्यापर्यंत जाऊ शकते. त्यामुळे, वाढीव मतदान, झेन जी मतदार यांचा कौल भाजपच्या बाजुने असल्याचा अंदाज राजकीय विशेषज्ञ लावत आहेत.
2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या टीएमसीने 215 जागा जिंकल्या होत्या. तर, भाजपला 77 जागांवरच समाधान मानावे लागले होते. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीकडेही देशाचे लक्ष लागले आहे. गत निवडणुकीत काँग्रेस आणि डावे पक्ष खातंही खोलू शकले नाहीत. मात्र, यंदाच्या निवडणुकीत त्यांना 6 ते 7 जागा जिंकता येतील, असा अंदाज आहे.