ठाणे शहरावर पाणी कपातीचे सावट

ठाणे : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांतील पाणीसाठा २८ टक्क्यांवर आल्याने पालिका प्रशासनाने १० टक्के कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम म्हणून मुंबई महापालिकेकडून ठाणे महापालिका क्षेत्रात होणाऱ्या पाणीपुरवठ्यातही १० टक्क्यांची कपात लागू होण्याची शक्यता आहे.

यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याच्या अंदाजामुळे ठाणे शहराला इतर स्त्रोतांमधून मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यातही कपात होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. परिणामी, ठाणे शहरावर पाणी कपातीचे सावट असल्याचे चित्र आहे. ठाणे महापालिका क्षेत्राला चार स्त्रोतांमार्फत दररोज ५९० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यात ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि मुंबई महापालिकेकडून ९० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा होतो.

ठाणे शहराची लोकसंख्या २७ लाखांच्या घरात गेली असून त्या मानाने शहराला प्रतिदिन ६२१ दशलक्षलीटर इतक्या पाण्याची गरज आहे. प्रत्यक्षात होत असलेल्या पाणी पुरवठ्यानुसार, शहराला ३१ दशलक्षलीटर इतके पाणी कमी मिळत आहे. त्यातच शहराचे मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असून यामुळे शहरात टंचाईची समस्या निर्माण होत आहे. एप्रिल महिन्यापासून ही समस्या अधिक तीव्र होऊ लागते. असे असतानाच, यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याच्या अंदाजामुळे ठाणे शहराला इतर स्त्रोतांमधून मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यातही कपात होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

मुंबई महापालिकेने अद्याप कपात लागू करण्याबाबत ठाणे महापालिकेला पत्राद्वारे कळविले नसले तरी, मुंबई महापालिकेने शहरात कपातीचा निर्णय लागू केल्याने आपोआपच त्यांच्याकडून ठाणे शहरालाही कपात लागू होण्याची शक्यता असल्याचा अंदाज पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. इतर तीन स्त्रोतांनी अद्याप पाणी कपातीचा निर्णय लागू केलेला नसला तरी, यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याच्या अंदाजामुळे इतर स्त्रोतांमधून ठाणे शहराला मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यातही कपात होण्याचा अंदाजही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मुंबई महापालिकेकडून होणारा पाणी पुरवठ्याचे वितरण ठाणे महापालिका कोपरी आणि वागळे इस्टेटच्या काही भागांमध्ये करते. दहा टक्के कपात लागू झाल्यास त्याचा फटका कोपरी तसेच वागळे इस्टेटमधील काही भागांना बसू शकतो, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

मुंबई महापालिकेने दहा टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला असला तरी, त्यांच्याकडून ठाणे शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात करण्याबाबत अद्याप कळविलेले नाही. तसेच इतर स्त्रोतांनीही अद्याप कपातीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. या स्त्रोतांनी कपात लागू केल्यास शहरातील पाण्याचे नियोजन करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया ठाणे महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी दिली.