सभा तहकुबी प्रस्तावावरून सेना-भाजपात पुन्हा खडाजंगी

नारी शक्ती वंदन अधिनियम प्रकरण

ठाणे: नारी शक्ती वंदन अधिनियम हे विधेयक नामंजुर केल्याच्या निषेधार्थ ठाणे पालिकेची सर्वसाधारण सभा पूर्ण दिवस तहकूब करण्याच्या कारणावरून शिवसेना आणि भाजप नगरसेवकांत वाद झाल्यानंतर बुधवारी पालिकेच्या सभेत या प्रस्तावावरून पुन्हा गदारोळ झाला. अखेर अर्धा तास सभा तहकुब करण्यात आली.

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत देशाच्या संसदेत नारी शक्ती वंदन अधिनियम हे विधेयक नामंजुर झाल्यामुळे काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांच्या महिला विरोधी भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी भाजपाचे भरत चव्हाण यांनी मांडलेल्या सभा तहकुबीवर चर्चा करण्यात आली. नारी शक्ती वंदन अधिनियम हे विधेयक काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांच्या महिला विरोधी भूमिकेमुळे नामंजुर झाले, अशी टीका भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी, मृणाल पेंडसे, श्रीमती मेटांगे यांनी आणि परिषा सरनाईक, विकास रेपाळे, राम रेपाळे या शिंदे गटाच्या नगरसेवकांनी केली. तर, खासदार शरद पवार यांनी यापूर्वीच महिलांना आरक्षण देण्याचे काम केले असून ते महिलाविरोधी कसे असा सवाल मर्जिया पठाण, श्रीमती जगताप या विरोधी पक्षाने उपस्थित केला.

महिलांना आरक्षण देण्यास विरोध नाही पण, त्या आडून जनगणनेआधीच लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढविणे हे चुकीचे आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उदघाट्न तसेच इतर कार्यक्रमाना बोलवत नाहीत, त्यांना मान देत नाही, हे महिलाविरोधी धोरण नाही का, जनगणनेआधी लोकसभा मतदारसंघ रचना करणे म्हणजे संविधानाचा अपमान आहे, असा टोला राष्ट्रवादी (शरद पवार ) पक्षाचे नगरसेवक सुधीर भगत यांनी केला. लोकसभेत विधेयकाच्या निमित्ताने झालेला पराभव लपविण्यासाठी आंदोलने केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच कॉँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष नारी शक्ती वंदन विधेयकावरून नेरेटिव्ह तयार करत आहेत, असा आरोप भाजप नगरसेवकांनी केला.

शरद पवार यांनी त्यांच्या मुलीला राजकारणात आणण्यासाठी महिला आरक्षण दिल्याचा आरोप भाजपा नगरसेवक सुरेश कांबळे यांनी करताच त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिंदे गटाच्या शिवसेना नगरसेवकांनी आक्षेप घेतला. शरद पवार हे देशाचे नेते आहेत, त्यांच्याविषयी असे विधान करणे चुकीचे आहे, असे सभागृह नेते हणमंत जगदाळे आणि नगरसेवक राम रेपाळे, रमाकांत मढवी यांनी सांगितले. तसेच नगरसेवकांनी शब्द मागे घेण्याचा आग्रह धरला. अखेर कांबळे यांनी शब्द मागे घेतले. तर, या प्रस्तावावरील चर्चेमुळे दोन तास वाया गेल्याचे विधान एमआयएमचे गटनेते सैफ पठाण यांनी करताच, भाजप तसेच शिंदे सेनेचे नगरसेवक आक्रमक झाले. महिलांवरील चर्चेमुळे सभागृहाचा वेळ कसा वाया गेला, अशी विचारणा करत त्यांना धारेवर धरले. यामुळे सभागृहातील वातावरण तापले होते. अखेर लोकांनी आम्हाला सभागृहात प्रभागातील प्रश्न मांडण्यासाठी पाठवले असून त्यावर चर्चा करावी. त्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयक चर्चा थांबावी, असे पठाण यांनी सांगितले. यानंतर सभा अर्धा तास तहकुब करण्यात आली.