डम्पिंग ग्राऊंडच्या मुद्द्यावरून सेना-भाजपात धुमसली आग

* उल्हासनगर महापालिकेत सत्ताधारी आमनेसामने
* भाजप नगरसेवकांचा ठिय्या

​उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या विशेष सभेत बुधवारी डम्पिंग ग्राऊंडच्या प्रश्नावरून सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यात तीव्र संघर्ष पाहायला मिळाला. कॅम्प क्रमांक ५ येथील अनधिकृत डम्पिंग ग्राऊंड तीन महिन्यांत हटवण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते, मात्र ही मुदत संपूनही कोणतीही कारवाई न झाल्याने भाजपच्या संतप्त नगरसेवकांनी पालिका मुख्यालयात जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले.

या आंदोलनादरम्यान नगरसेवक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या झटापटीमुळे महापालिका परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पॅनल क्रमांक १९ आणि २० मधील नगरसेवक राजा वानखेडे, राजू गोपलानी, विपुल मायकर, रत्नामाला दुर्गे यांच्यासह अनेक सदस्यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला.

२८ नगरसेवकांनी लेखी निवेदन देऊनही हा विषय जाणीवपूर्वक दडपल्याचा आरोप भाजपने केला. या डम्पिंगच्या दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. या आरोपांना शिवसेनेचे राजेंद्र चौधरी आणि अरुण आशान यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. सत्तेत एकत्र असताना भाजप केवळ राजकारण करत असून, उपमहापौर अमर लुंड हे भाजपचेच आहेत, त्यांना या विषयाची पूर्ण कल्पना असताना शिवसेनेवर आरोप करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सुनावले.

​या गदारोळात महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी प्रशासनाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या तिन्ही शहरांचा संयुक्त कचरा प्रकल्प बदलापूर येथे प्रस्तावित असून लवकरच शिष्टमंडळ त्याची पाहणी करणार असल्याचे स्पष्ट केले.