ठाणे महापालिकेची मोहीम फत्ते
ठाणे: जनगणना २०२७च्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने घरांची मोजदाद आणि परिसर नोंदणी (एचएलबी डिमार्केशन) अवघ्या तीन दिवसांत पूर्ण करत मोठी कामगिरी बजावली आहे. केवळ पाच कर्मचाऱ्यांच्या टीमने पहाटे ६ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत काम करत ५,२६५ हाऊस लिस्टिंग ब्लॉक्सची मोहीम शंभर टक्के पूर्ण केली. या मोहिमेत सुमारे २७ लाख ठाणेकरांचा डेटा तयार करण्यात आल्याची माहिती मिळते.
ठाणे महानगरपालिकेने आगामी जनगणना प्रक्रियेच्या अनुषंगाने व्यापक तयारी सुरू केली आहे. या कामासाठी नऊ प्रभाग समिती अंतर्गत एकूण ७८ फिल्ड ट्रेनर्स (क्षेत्रीय प्रशिक्षक) यांची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यंदाच्या जनगणनेत डिजिटल प्रणालीचा वापर करून एचएलओ अॅपद्वारे घरगणना करण्यात आली. पहिल्यांदाच अशा स्वरूपामध्ये जनगणना होत असल्यामुळे ठाणे महापालिकेसाठी सुद्धा हे एक आव्हान होते. प्रशिक्षण कालावधीमुळे सुरुवातीला ही मोहीम कासव गतीने चालली त्यामुळे राज्यात ठाणे महापालिका साठाव्या क्रमांकावर होती.उपायुक्त मधुकर बोडके यांच्या नेतृत्वात पाच कर्मचाऱ्यांच्या टीमने शहरातील तब्बल ५२६५ हाऊस लिस्टिंग ब्लॉक्स पूर्ण केले आहेत.
साधारणपणे एका एचएलबीमध्ये ८०० घरांचा समावेश असतो. त्या आधारे पाहिले तर ठाण्यातील २७ लाख नागरिकांचा प्राथमिक डेटा या प्रक्रियेत समाविष्ट झाला आहे. ही प्रक्रिया म्हणजे प्रत्येक घर, इमारत, परिसर यांची नोंद करून भविष्यातील जनगणना, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सेवा यांसारख्या नागरी सुविधांचे नियोजन करण्याचा पाया आहे. त्यामुळे या मोहिमेचे महत्त्व अधिक आहे.
या झपाट्याने केलेल्या कामामुळे ठाणे महापालिकेने राज्यातील क्रमवारीत ६०व्या स्थानावरून थेट ३०व्या स्थानावर झेप घेतली आहे. शनिवार ते सोमवार या कालावधीमध्ये दिवस रात्र पालिका अधिकारी, कर्मचारी एकाच ठिकाणी ठाण मांडून बसल्याने ही कामगिरी झाली असलो उपायुक्त मधुकर बोडके यांनी दिली.
चौकट
एकूण एचएलबी : ५,२६५
पूर्ण झालेले जिओ-टॅगिंग : १०० टक्के, पूर्ण डिमार्केशन : १०० टक्के
प्रलंबित काम : शून्य
दिव्यात घरांची गर्दी
प्रभागनिहाय एच एल बी नोंदणीमध्ये सर्वाधिक घरांची गर्दी दिवा प्रभाग समितीमध्ये आढळून आली आहे. तर नवीन ठाणे म्हणून ओळखले जाणारे माजीवडा-मानपाडा दुसऱ्या स्थानकावर आहे.
प्रभागनिहाय एचएलबी नोंदणी
माजीवडा -मानपाडा: ९०३, वर्तकनगर: ५१२, लोकमान्य-सावरकरनगर: ५४२, वागळे: २३०, उथळसर: ४०२, नौपाडा-कोपरी: ३२५, कळवा: ६२२, मुंब्रा: ५१६, दिवा: १,२१३